वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची स्पष्टोक्ती : खांडेपार विभागीय कार्यालयाचे उद्घाटन
वार्ताहर /मडकई
राज्यातील वीज पुरवठ्यात आमुलाग्र बदल घडवून आणताना, प्रत्येक मतदार संघात भुमिगत वीज वाहिन्या कार्यान्वित केल्या जात आहेत. काही ठिकाणी निधी कमी पडत असला तरी निधी अभावी कुठल्याच मतदार संघाचे काम अडून राहणार नाही. फोंडा मतदार संघातील कुर्टी पंचायत क्षेत्रात विभागीय वीज कार्यालय सुऊ करण्याची मागणी स्थानक आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांनी केली होती. एका महिन्यात हे कार्यालय सुऊ करण्यात आले आहे. कुर्टी पंचायत क्षेत्रातील नागरिकांची मागणी पूर्ण करताना त्याचे श्रेय आपण मंत्री रवी नाईक यांना देत आहे, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. खांडेपार येथे वीज खात्यातर्फे विभागीय कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री सुदिन ढवळीकर ढवळीकर बोलत हेते. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य प्रिया च्यारी, पंचसदस्य निळकंठ नाईक, बाबू च्यारी, कार्यकारी अभियंते पी. पी. भरथन, कनिष्ठ अभियंते गौरेश सावईकर आदी उपस्थीत होते. वीज पुरवठ्यासंबंधी नागरिकांना तक्रारी असल्यास त्यांना थेट या कार्यालयाशी संपर्क साधता येईल. या कार्यालयासाठी वीज खात्याला विनाशुल्क जागा देऊन जनतेप्रती असलेली भावना कुर्टी खांडेपार पंचायतीने व्यक्त केली आहे. त्यासाठी मंत्री ढवळीकर यांनी पंचायतीचे आभार मानले.
अमरनाथनी विद्युत चुंबकीय क्षेत्र शिकुन घ्यावे
काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अमरनाथ पणजीकर यांनी मंत्र्याचा राजीनामा मागून केलेली टीका नकारात्मक आहे. विद्युत चुंबकीय क्षेत्र कसे असते हे त्यांनी आधी शिकुन घ्यावे. शिक्षक असूनही सामान्य ज्ञानाचा अभाव त्यांच्या टिकेतून दिसून आला. ‘अतिशहण्याचा बैल रिकामी’ असतो. हे पणजीकर यांनी लक्षात घ्यावे. त्यामुळे आपण त्यांच्यावर कुठलीच टीका करीत नाही. त्यांना काही गोष्टी समजून घ्यायच्या असल्यास त्यांनी वीज खात्याच्या प्रमुख अभियंत्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करावी आणि आपले वक्तव्य मागे घ्यावे, असा सल्लाही मंत्री ढवळीकर यांनी दिला. वीज खात्यावर केलेली टिका सकारात्मक असावी. सकारात्मक टीकेतून विकासाचे अनेक पैलू दृष्टिपदास येत असतात. कंदब बसस्थनाकासंबंधीची टिका सकारात्मक होती. म्हणूनच पंधरा दिवसात समस्या निकालात काढली.
वर्ष 2050 पर्यंत 50 टक्के सौर उर्जा
‘सौर उर्जा निर्मिती हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्यासाठी देशाच्या प्रत्येक राज्यात सौर उर्जा निर्मितीवर भर देण्यात आला आहे. भविष्यात गोव्यात सौर उर्जेची निर्मिती 1 हजार मॅगा व्हॉल्टस्च्या ही पुढे जातील अशी आशा मंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केला. विद्यमान स्थितीत गोव्यात 35 मॅगा व्हॉल्टसची निर्मिती होत आहे. वर्ष 2030 पर्यंत 150 मॅगा व्हॉल्टस्पर्यंत ही क्षमता वाढेल. देशात कोळशापासून तयार होणारी वीज 72 टक्के आहे. त्यामुळे प्रदूषण वाढत आहे. राज्याला लागत असलेल्या वीजेपैकी पन्नास टक्के वीज सौर उर्जेतून निर्माण केली जाईल. वर्ष 2050 पर्यंत त्यात खूप मोठे परिवर्तन घडवून आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.









