हेस्कॉमचे दुर्लक्ष : नागरिकांचा जीव टांगणीला
प्रतिनिधी /बेळगाव
हेस्कॉमकडून काही वर्षांपूर्वी भूमिगत विद्युत वाहिन्या घालण्यात आल्या आहेत. परंतु घिसाडघाईने झालेल्या या कामामुळे बऱ्याच ठिकाणी निकृष्टदर्जाचे काम झाले आहे. काही ठिकाणी विद्युत वाहिन्या जमिनीच्या वर आल्या असून नागरिकांना येण्याजाण्यास अडथळा ठरत आहेत. हेस्कॉमच्या या गलथान कारभारामुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे.
मुख्य विद्युत वाहिन्या भूमिगत घालण्याचा प्रकल्प बेळगावमध्ये राबविण्यात आला आहे. संपूर्ण शहरात 350 कोटी रुपये खर्च करून भूमिगत वाहिन्या घालण्यात आल्या. परंतु हे काम करताना अनेक ठिकाणी निष्काळजीपणा करण्यात आला आहे. काही ठिकाणी गटारीतून तर काही ठिकाणी ड्रेनेज पाईपमधून विद्युत वाहिन्या घालण्याचे प्रकारही समोर आले होते. प्रकल्प पूर्ण होऊन दोन वर्षे उलटली तरी अद्याप बऱ्याच ठिकाणी विद्युत वाहिन्या जमिनीवर दिसत आहेत.
अनर्थ घडल्यास हेस्कॉम जबाबदार राहणार का?
शहराच्या मध्यवर्ती भागातील मारुती गल्ली येथे विद्युत वाहिन्या रस्त्याच्या वर आल्या आहेत. या वाहिन्या सुरू आहेत किंवा बंद याचीही माहिती नागरिकांना नाही. दररोज शेकडो नागरिक या रस्त्याने ये-जा करतात. त्यामुळे विजेचा धक्का लागून अनर्थ घडल्यास त्याला हेस्कॉम प्रशासन जबाबदार राहणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.









