परीक्षेत पाठबळ : जि. पं. चा नावीन्यपूर्ण उपक्रम
बेळगाव : ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी सक्षम हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील 6308 विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे. जिल्हा पंचायतीतर्फे राबविलेल्या या उपक्रमासाठी 10 लाख रुपयांचे अनुदानही मिळाले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी आणि सीईटी, नीट परीक्षेच्या तयारीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरू लागला आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 19 तर चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील 15 कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यातील पदवीपूर्व महाविद्यालयांतील विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी हा उपक्रम घेतला जातो. या अंतर्गत सीईटी, नीट परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जात आहे. त्यामुळे भविष्यात स्पर्धात्मक परीक्षांना सामोरे जाताना कौशल्य आणि मानसिक बळ विद्यार्थ्यांना प्राप्त होऊ लागले. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होऊ लागला आहे. काही महिन्यांपूर्वी इतर जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांनी या उपक्रमाला भेट देऊन गौरवोद्गार काढले होते. शिवाय जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुकही केले होते.









