खोदाईसह काँक्रिटीकरणाला सुरुवात : मोठ्या प्रमाणात भराव काढण्यात आला
बेळगाव : अनगोळ येथील चौथे रेल्वेगेट येथील रोड अंडरब्रिजच्या कामाला गती आली आहे. मागील चार दिवसांत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खोदाईचे काम केले जात असून त्याचबरोबर काँक्रिट घालण्याचे कामही सुरू आहे. दिलेल्या वेळेत ब्रिजचे काम पूर्ण करण्यासाठी नैर्त्रुत्य रेल्वेकडून गतीने काम सुरू ठेवण्यात आले आहे. सततच्या वाहतूक कोंडीमुळे अनगोळ येथील चौथे रेल्वेगेट येथे रोड अंडरब्रिज मंजूर करण्यात आले. मागील तीन महिन्यांपासून रेल्वेगेट बंद ठेवून रोड अंडरब्रिजच्या कामामध्ये अडथळे ठरलेल्या जलवाहिन्या, गॅसवाहिन्या, वीजवाहिन्या जोडणीचे काम करण्यात आले. तसेच मुसळधार पावसामुळे भराव काढणे शक्य नव्हते. त्यामुळे सप्टेंबर महिन्यापासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यानंतर रोड अंडरब्रिजच्या कामाला सुरुवात झाली.
लवकर काम पूर्ण करण्याची मागणी
सोमवार दि. 15 रोजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांच्या हस्ते रोड अंडरब्रिजच्या कामाचे भूमिपूजन झाले. त्या दिवशीपासूनच भराव काढण्याच्या कामाला सुरुवात झाली. उद्यमबाग रोड तसेच अनगोळच्या बाजूने मोठ्या प्रमाणात भराव काढण्यात आला आहे. गुरुवारपासून खोदाई केलेल्या ठिकाणी काँक्रिट घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून लवकर काम पूर्ण करून मार्ग खुला करण्याची मागणी केली जात आहे.









