लाभार्थ्यांचा संभ्रम दूर : अन्न-नागरी पुरवठा खात्याचे स्पष्टीकरण
बेळगाव : राज्य सरकारने पाच गॅरंटी योजनांची घोषणा केली आहे. शक्ती, अन्नभाग्य, गृहज्योती आणि गृहलक्ष्मी योजनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. अन्नभाग्य योजनेंतर्गत सप्टेंबर महिन्यात निधी दिला जाणार आहे. यापूर्वी सरकारने सप्टेंबरमध्ये 10 किलो तांदूळ देण्याचे स्पष्ट केले होते. अखेर पुरेसा साठा नसल्याने निधी देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये निधी मिळणार की तांदूळ याबाबतचा संभ्रम दूर झाला आहे. सरकारने निवडणुकीदरम्यान पाच गॅरंटी योजनांची घोषणा केली होती. त्यामध्ये अन्नभाग्य योजनेचादेखील समावेश आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 10 किलो तांदूळ देण्याचे निश्चित झाले होते. मात्र सरकारकडे पुरेसा तांदूळसाठा नसल्याने जुलै आणि ऑगस्ट महिन्यात माणसी 170 रुपये देण्यात आले होते. शिवाय सप्टेंबरपासून 10 किलो तांदूळ दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे सप्टेंबरमध्ये तांदूळ मिळणार की निधी? याबाबत लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अखेर सरकारने सप्टेंबरमध्ये जुलै-ऑगस्टप्रमाणेच निधी देण्याचे निश्चित केले आहे.
जनमताचा घेतला कौल
तसेच काही लाभार्थी कायम निधी देण्यात यावा, अशी मागणी करत आहेत. तर काही लाभार्थी तांदूळ देण्यात यावा, अशी अपेक्षा करून आहेत. यासाठी खात्याने जनमताचा कौलदेखील घेतला आहे. शिवाय सप्टेंबरमध्ये जुलै-ऑगस्टप्रमाणेच बीपीएल कार्ड लाभार्थ्यांना माणसी 170 रुपये दिले जाणार आहेत.
बँकखाते सुरळीत करून घ्या…
सप्टेंबर महिन्यातही जुलै-ऑगस्ट महिन्यांप्रमाणे लाभार्थ्यांना निधी दिला जाणार आहे. काही लाभार्थ्यांचा जुलै तर काही लाभार्थ्यांचा ऑगस्ट महिन्याचा निधी मिळालेला नाही. अशा लाभार्थ्यांनी डीबीटीसाठी बँकखाती सुरळीत करून घ्यावीत. खात्याकडून निधीचे वाटप सुरळीतपणे सुरू आहे.
-श्रीशैल कंकणवाडी (अन्न व नागरी पुरवठा खाते)









