वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिकेत 19 वर्षाखालील वयोगटासाठी तिरंगी वनडे मालिका खेळविली जात आहे. या मालिकेतील शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय युवा संघाने अफगाण युवा संघाचा 6 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात भारत युवा संघातील सलामीचा फलंदाज आदर्श सिंगने नाबाद शतक (110) झळकवले.
या तिरंगी वनडे स्पर्धेत भारत, अफगाण आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. शुक्रवारच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून अफगाणला प्रथम फलंदाजी दिली. अफगाणचा डाव 48.2 षटकात 197 धावात आटोपला. त्यानंतर भारताने 36.4 षटकात 4 बाद 202 धावा जमवित हा सामना जिंकला.
अफगाणच्या डावात सोहेल खानने 2 षटकार आणि 4 चौकारांसह 71, कर्णधार नासिर खानने 24, जमशेद झेद्रानने 2 चौकारांसह 26, हसन फैझलने 40 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांसह 54 धावा जमविल्या. भारतातर्फे एस. पांडे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 29 धावात 6 गडी बाद केले. राज लिंबानीने 2 तर अभिषेकने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताच्या डावात सलामीच्या आदर्श सिंगने 107 चेंडूत 2 षटकार आणि 14 चौकारांसह नाबाद 110 धावा झोडपल्या. कुलकर्णीने 4 चौकारांसह 20, उदय सेहरनने 1 तर अविताबने 7 धावा केल्या. मुशिर खानने 56 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 39 धावा जमविल्या.
सक्षिप्त धावफलक – अफगाण 48.2 षटकात सर्व बाद 197, भारत 36.4 षटकात 4 बाद 202 (आदर्श सिंग 110, आर्शित कुलकर्णी 20, सेहरम 1, मुशिर खान नाबाद 39, अवांतर 21).









