वृत्तसंस्था/ कोलकाता
भारताचा अव्वल बुद्धिबळपटू डी. गुकेश हा ‘टाटा स्टील चेस इंडिया’च्या ‘ओपन ब्लिट्झ’ विभागात तिसऱ्या फेरीनंतर दोन बरोबरी आणि एक विजयासह अपराजित राहिला आहे. पाच वेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंदला 37 वर्षांनंतर आपली आघाडीची जागा सोडायला लावणाऱ्या या 17 वर्षीय खेळाडूने सध्या दोन गुण कमावलेले असून आणखी सहा फेऱ्या बाकी आहेत.
अझरबैजानचा 2019 चा विश्वचषक विजेता तैमूर रादजाबोव्ह, 2021 चा विश्व ब्लिट्झ विजेता फ्रान्सचा मॅक्सिम व्हॅचियर-लॅग्रेव्ह आणि 2022 चा रॅपिड जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेता व्हिन्सेंट कीमर हे संयुक्तरीत्या आघाडीवर असलेल्या खेळाडूंपैकी इतर तीन खेळाडू आहेत. 18 वर्षीय जर्मन खेळाडू कीमरने तिसऱ्या फेरीत आर. प्रज्ञानंदला पराभूत करून सर्वांना धक्का दिला. यामुळे प्रज्ञानंद 1.5 गुणांसह दुसऱ्या स्थानावर ढकलला गेला आहे. आलेक्झांडर ग्रिशुक आणि नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह देखील प्रत्येकी 1.5 गुणांवर आहेत आणि आघाडीवर असलेल्या खेळाडूंच्या जवळपास फिरत आहेत.
आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर असलेल्या प्रज्ञानंदने काळ्या प्याद्यांसह ग्रँडमास्टर तैमूर रदजाबोव्हवर विजय मिळवून या स्पर्धेतील वाटचालीला सुरुवात केली. दुसऱ्या फेरीत त्याने वॅचियर-लॅग्रेव्हविऊद्ध बरोबरी साधली, पण दिवसाचा शेवट कीमरविऊद्धच्या पराभवाने झाला. दुसरीकडे, गुकेशने आपल्या मोहिमेची सुऊवात नोदिरबेक अब्दुसत्तोरोवविऊद्ध बरोबरी साधून केली. दुसऱ्या फेरीत गुकेश व पी. हरिकृष्ण यांच्यात जोरदार लढत होऊन त्यात शेवटी गुकेशची सरशी झाली. त्यानंतर दिवसाच्या शेवटच्या फेरीत गुकेश आणि अलेक्झांडर ग्रिशुक यांच्यातील सामना 97 चालींनंतर बरोबरीत संपला.









