सांगली / विनायक जाधव :
जिल्हयात गेल्या दोन आठवड्यात चार खून झाले. यापैकी तीन खून किरकोळ कारणावरून झाले. या खूनातील सहभागी संशयित घरचेच आहेत. या खूनाबद्दल चौकशी कशी करायची आणि शिक्षा कशी द्यायची असा सवाल पोलीसांसमोर आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून पतीनेच पत्नीचा खून केला. सराव परिक्षेत गुण कमी पडले म्हणून मुलीचा बापाकडून खून झाला. खून का बदला खून म्हणत बापाच्या खूनाचा बदला घेतला गेला. प्रेमप्रकरणांतून कुपवाड येथील तरूणाचा दोघांकडून खून करण्यात आला. अशा घटना समाजाला अधोगतीला नेणाऱ्या ठरत आहेत. हे खून फक्त राग आवरला नाही म्हणून झालेत. हे खून कसे रोखायचे हा सवाल सांगली पोलीसांसमोर उभा ठाकला आहे.
चारही खून पोलीसांनी तात्काळ उघडकीस आणले. संशयितांना अटकही केली. पण चौघांच्या या कृत्यामुळे चार कुंटुंबे उद्ध्वस्त झाली याचा विचार कोण करणार आहे. या घटना जिल्ह्याच्या लौकीकाला काळीमा फासणाऱ्या ठरत आहेत. या घटना संशयाचा अतिरेक, रागाचा अनावर आणि खून का बदला खून अशा कारणांमुळे घडल्या आहेत. पोलीसांपुढे अशा घटना रोखायच्या कशा हा प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्याला काहीही फरक पडत नाही अशी जी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. ही भावनाच समाजविघातक ठरत आहे. अशा घटनांमध्ये कृत्य करणाऱ्याच्या मनात दहशत निर्माण होणाऱ्या गोष्टी घडल्या तरच समाजात अशा घटना करणाऱ्याविरूध्द संदेश जातील.
अशा घटनांमुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न विचारले जात आहेत. हे खून अगदी किरकोळ कारणातून घडले आहेत. जिल्ह्यात सन २०२४ साली एकूण ५५ खून झाले. तर गेल्या पाच महिन्यात २५ खून झाले आहेत. महिन्याला सरासरी पाच ते सहा जणांचा खून होतो हे भयावह सत्य आहे.
हे खून कसे रोखायचे….
जिल्ह्यात जे खून झाले त्याची कारणे किरकोळ आहेत. पण खून निघृणपणे झाले आहेत. भाजी विक्रेत्याचा खून पाठलाग करून केला गेला. त्याचे नामोनिशाण राहणार नाही अशा पध्दतीने मारले. या प्रकरणांचा तपास करत असताना पोलीसांना यात खूनाचा बदला खून असा हेतू समोर आल्यावर संशयिताला अटक करण्यात आले. संशयिताने आपण त्याला संपवणारच होतो असे सांगितले. त्यामुळे पोलीसांना असे खून कसे रोखायचे हा प्रश्न पडला आहे.
बापाकडून मुलीचा खून झाला याचे कारण किरकोळ होते. सराब परिक्षेत कमी गुण मिळाल्याचा जाब विचारत असताना मुलीने बापाला काही प्रतिप्रश्न केले. त्या प्रतिप्रश्नावरून बापाला राग आवरला नाही. त्यांने मुलीला जात्याच्या खुट्याने बेदम मारहण केली. या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला. यामध्ये वडील मुख्याध्यपक आहेत. इतका अनावर राग करून मुलीच्या बापाने काय कमविले. स्वतःच्या मुलीला त्यांने संपविले आणि तो स्वतः कारागृहात गेला. कुंटुंब उद्ध्वस्त झाले. कुपवाड येथील उमेश पाटील याचा खून प्रेमप्रकरणांच्या संशयातून दोघांकडून करण्यात आला. यामध्ये एका अल्पवयीनचाही समावेश आहे. सहजपणे सांगलीत खून होत आहेत. अशा खूनांमुळे सांगलीची बदनामी होत आहे.
- संशयामुळे कुंटुंब उध्दवस्त
संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजर्षि शाहूनगर येथे एका बांधकाम कामगाराने त्याच्या पत्नीचा चारित्र्याच्या संशयामुळे खून केला. हा खून केल्यानंतर तो दोन लहान मुलांना घेवून स्वतःच्या मंगळवेढा गावात पळून गेला. पण पोलीसांनी त्याला अटक करून आणले. या पतीच्या कृत्यामुळे पत्नीला जीव गमावावा लागला आणि तो स्वतः कारागृहात गेला आणि दोन लहान मुले अनाथ झाली. एका संशयामुळे ही घटना घडली आहे. या चारही खूनाचा तपास पोलीसांनी तात्काळ सुरू केल. त्यांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची मदत मिळाली. या खूनाचा उलगडा तात्काळ झाला पण हे खून का थांबवता आले नाहीत, याचा मात्र उलगडा होत नाही. जिल्हयाची प्रतिमा डागळली जात आहे. याबाबतपोलीस यंत्रणेने नाही तर समाजातील धुरिणांनी विचार करण्याची गरज आहे.
- सांगलीत गेल्या आठ वर्षात झालेले खून
सन खून
२०१७ ४३
२०१८ ६९
२०१९ ५९
२०२० ५५
२०२१ ६८
२०२२ ५६
२०२३ ६९
२०२४ ५५
मे २०२५ पर्यंत 25








