महाराष्ट्राची आजची स्थिती अशी आहे की, अजित पवार यांनी ठरवले तरी ते आता महाविकास आघाडीत येऊ शकत नाहीत आणि शरद पवार भाजप सोबत जाऊ शकत नाहीत. दोघांच्याही वाटा वेगळ्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरचा ताबा हा त्यांच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळेच शरद पवारजी वक्तव्ये करत आहेत. त्यातून अनेकांचा गोंधळ उडत असला तरीही वरच्या मूळ मुद्याला विसरले नाही की चित्र स्पष्ट दिसू लागते. पण, ज्यांना काही समजूनच घ्यायचे नाही ते त्यातून गोंधळ वाढवतात आणि स्वत:ही गोंधळून जातात. माध्यमेही या गोंधळात वाढ करत आहेत हे विशेषच! शिवसेना पक्षाचा न्यायालय आणि निवडणूक आयोगात जो वाद सुरू आहे तो लक्षात घेतला तर या निकालाला लागणारा विलंब आणि निवडणूक आयोगाने घेतलेली भूमिका लोकांना अजिबात पटणारी नाही. मात्र तरीही प्रक्रियेचा भाग म्हणून ते सगळे पाहत बसावेच लागते. शरद पवार या प्रक्रियेला कोळून प्यालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याबाबतीत निवडणूक आयोगात ते काही पहिल्यांदा गेलेले नाहीत. अजित पवार यांच्या आधी पी. ए. संगमा यांना पुढे करून पवार यांच्या ताब्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हिसकावून घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. तो प्रयत्न त्यावेळी पुरता फसला होता. त्यामुळे, आता विरोधातच निर्णय देणार याची खात्री असलेल्या निवडणूक आयोगासमोर सगळे सत्य मान्य करून स्वत:चे नुकसान करून घेण्यास शरद पवार तयार नाहीत. अजित पवार फुटले आहेत असे म्हणण्याऐवजी पक्षातील काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे असे उद्गार त्यांनी काढले आहेत. गावोगावी होणाऱ्या सभांमधून ते दूर गेलेल्या सहकाऱ्यांचा उघड समाचार घेत आहेत. दुसरीकडे पवार आपलीच पक्षाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी केलेल्या अजित पवार यांना आता माफी नाही हेही सांगत आहेत. मात्र अजित पवार आपल्या पक्षातून फुटले आहेत हे मात्र ते मान्य करायला तयार नाहीत. यामुळे शरद पवारांचा पक्ष अजित पवारांच्या ताब्यात देण्याची खूप इच्छा असलेल्या निवडणूक आयोगाचीसुद्धा गोची झाली आहे. पक्ष फुटीची चिन्हे दिसत होती तेव्हापासून आजअखेर शरद पवार सहजासहजी अजित पवार यांची पक्षातून हकालपट्टी करून राजकीय शहीद करायला तयार नाहीत. कारण, पक्ष जरी शरद पवार यांचा असला आणि राष्ट्रीय कार्यकारिणी, अध्यक्षपद त्यांच्या ताब्यात असले तरी पक्षातील सर्वाधिक आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. शिवसेनेबाबतीत निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला त्याचीच पुनरावृत्ती राष्ट्रवादी बाबतीत आयोगाच्या निकालातून होऊ शकते. हे जर स्पष्ट दिसत असेल तर कुठलाही पक्षाचा संस्थापक शिवसेनेचा धडा घेऊन असल्या खेळीला बळी पडणार नाही. अजित पवार आपण पक्षातच आहोत म्हणत असतील तर आमच्या पक्षात फूट पडली असे कसे म्हणता. तुमच्याकडे त्याबद्दल काय पुरावा आहे तो आम्हाला द्या मग आम्ही मत मांडू असे सांगून शरद पवारसुद्धा त्याच पद्धतीची उलटी चाल खेळत आहेत. उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षात फूट पडली हे मान्य केले. निवडणूक आयोगाने मागितले म्हणून लाखो प्रतिज्ञापत्रे त्यांनी आयोगात सादर केली. पक्षाचे सर्वाधिक राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य ते जिल्हाध्यक्ष आम्ही सभासद आपल्यासोबत आहेत याचे ट्रक भरून पुरावे त्यांनी आयोगाला दिले. पण, ज्या आयोगाने त्यांच्याकडून ती प्रतिज्ञापत्रे मागवली त्यांनी त्यातील एक कागदही उघडून न बघता उलट अशी कागदपत्रे तपासण्याची कोणतीही यंत्रणा आयोगाकडे नाही असे म्हणून केवळ आमदारांच्या संख्याबळाच्या मोजणीच्या आधारावर पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना देऊन टाकले. शरद पवार आपल्या पक्षाबाबतीत ही खेळी यशस्वी होऊ देत नाहीत आणि त्यासाठी ते उलटसुलट वक्तव्य करून अजित पवार यांची अस्वस्थता वाढवत आहेत. परिणामी जिथे वादच नाही त्या पक्षात हस्तक्षेप करणे निवडणूक आयोगाला अडचणीचे ठरले आहे. त्यांना नोटिसीच्या पुढे फार काही करता आलेले नाही. शरद पवार यांची पत्रकार परिषद आणि सभा यामध्ये फरक पडतोय तो यामुळेच. दुसरीकडे अजित पवारसुद्धा आपण पक्षातून फुटलो असे म्हणत नाहीत. शिवाय आपल्या पत्रकार परिषदा आणि सभांमध्ये नरेंद्र मोदींचे गुणगान गायला मागेपुढे पाहत नाहीत. आपणच आपल्या पक्षाचे अध्यक्ष आहोत असे अजित पवार यांचे म्हणणे आहे. सुनील तटकरे हे त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांनी शरद पवार, जयंत पाटील यांची पदावरून हकालपट्टी केली आहे. पण, हे करूनही राष्ट्रीय आणि राज्याचे अध्यक्ष असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या पक्षात फूट पडली आहे हे मान्य केले नाही तर पक्ष नावावर करण्याचे नवे मॉडेल यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे आता शरद पवारांनी जयंत पाटील यांनी आपला पक्ष फुटला आहे हे मान्य करणे ही अजित पवार यांच्या पाठीराख्यांची गरज बनलेली आहे. अजित पवार आमचे नेते आहेत, मी प्रदेशाध्यक्ष आहे, आमचा पक्ष भाजपा बरोबर सत्तेत सामील झाला आहे आणि आम्ही एनडीएचा भाग आहोत, असे सुनील तटकरे सांगत आहेत! पक्षात फूट पडली आहे हे निवडणूक आयोगाने जाहीर करणे ही त्यांचीही गरज आहे. पण, निवडणूक आयोगाला शरद पवारांनी ते म्हणणे मान्य केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्याला बगल देणारे हे मॉडेल पवारांच्या खेळीत रुतून बसले आहे. परिणामी अजित पवार पुन्हा शरद पवारांना सामील होणार असेही वातावरण अजित पवारांसोबत सत्तेत असणाऱ्या सख्ख्या विरोधकांकडून केले जाऊ लागले आहे! जे सत्तेत एकत्र आहेत त्यांनी एकमेकांच्या पायात पाय घातले आहेत आणि जे एकाच पक्षात आहेत त्यांनी आमच्यात फूट पडली नाही असे एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून सांगत एकमेकाची मान मोडण्याचा प्रयत्न चालवला आहे. ही खेळी निवडणुका समोर येईपर्यंत लांबवायची अशी दोन्ही बाजूची इच्छा दिसते. कुस्तीच्या भाषेत याला खडाखडी म्हणतात. दोन पैलवान एकमेकांची मान धरून एकमेकाची जोर आजमाईश करतात. तशी पवार काका पुतण्याची खडाखडी सुरू आहे.








