राष्ट्रवादीतील बंडाचा प्रवासही शिवसेनेच्याच दिशेने सुरू असून, पक्षावर ताबा मिळविण्यासाठीची पवार काका-पुतण्यांमधील लढाई पुढच्या काही दिवसांत अधिक तीव्र होण्याची लक्षणे आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अशा दोन गटांमध्ये सरळसरळ पक्ष विभागला गेला असून, या दोघांपैकी कुणाच्या मागे पक्षाचे सर्वाधिक आमदार व संघटना आहे, हे कळण्यासाठी आणखी काही दिवस जावे लागणार आहेत. त्या दृष्टीकोनातून बुधवारची दोन्ही गटांची बैठक महत्त्वाची म्हणता येईल. दोन्ही गटाकडून पक्षातील पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, प्रदेश प्रतिनिधी यांना पाचारण करण्यात आले आहे. या बैठकीस कोण-कोण उपस्थित राहणार, यावरून बऱ्यापैकी अंदाज येऊ शकतो. किंबहुना, राष्ट्रवादी कुणाची, हा निर्णय लवकरात लवकर लागण्याची शक्यता कमीच असेल. सेनेतील अभूतपूर्व फूट, न्यायालयीन प्रक्रिया, निकाल, निवडणूक आयोगाचा पक्ष-चिन्हाबाबतचा निर्णय यात मोठे कालहरण झाल्याचे राज्याने पाहिले आहे. सेनेतील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. हे पाहता राष्ट्रवादीसाठीही विधिमंडळ वा न्यायालयीन लढाईची वाट खडतर असेल. पवार यांच्यासह नऊ जणांचा शपथविधी पार पडल्यानंतर राष्ट्रवादीने या सगळ्यांविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रतेची याचिका दाखल केली असून, त्यावर तातडीने निर्णय घेण्याची विनंती केल्याचेही दिसून येते. सेनेच्या 16 आमदारांसह अपात्रतेसंदर्भातील काही याचिकांवर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यात दाखल याचिका किती दिवसांत निकाली काढावी, याची विधीमंडळाच्या नियमात स्पष्ट तरतूद नाही किंवा ठराविक दिवसांत संबंधित याचिका निकाली काढावी, याचेही कोणते बंधन अध्यक्षांवर नाही. या नियमावलीचा अध्यक्ष व सत्ताधारी सदुपयोग करून घेतील, हे वेगळे सांगायला नको. बंडानंतर पहिल्या दिवशी पवार यांनी कोर्टबाजीपेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊन लढण्याचा पवित्रा जाहीर केला आहे. परंतु, प्राप्त परिस्थिती पाहता पवार यांना दोन्ही आघाड्यांवर लढणे क्रमप्राप्त असेल. सेना फोडताना ज्या रणनीतीचा वापर करण्यात आला, तीच राष्ट्रवादीकरिताही वापरल्याचे पहायला मिळते. अजितदादा गटाने संपूर्ण पक्षावर केलेला दावा, प्रदेशाध्यक्षपदावरून जयंत पाटील यांची केलेली हकालपट्टी, पात्र की अपात्र, पक्ष आणि पक्षचिन्ह ठरविण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडेच असल्याचे सांगणे, यातून त्यांची पुढील दिशा काय असेल, याचा अंदाज येतो. हे पाहता कायदेशीर लढाईचा पर्यायही पवार यांना डोळ्यासमोर ठेवावा लागेल. अर्थात एकापाठोपाठ एक वेगवेगळ्या पक्षांवर असे दरोडे पडत असतील, तर न्यायव्यवस्थेनेही केवळ बघ्याची भूमिका घ्यायची काय? भविष्यात संपूर्ण देशाच्या राजकारणावर याचे वाईट परिणाम होऊ शकतात. महाराष्ट्राचा पॅटर्न पुढच्या काही महिन्यांत अन्य राज्यांमध्येही मूर्त ऊपात पहायला मिळाल्यास आश्चर्य वाटून घ्यायचे कारण नाही. म्हणूनच लोकशाहीच्या चौथ्या स्तंभापैकी एक असलेल्या न्यायदेवतेनेही याकडे लक्ष देणे गरजेचे ठरते. महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांचा विचार केल्यास यापुढे ती अधिक उलटपुलट झालेली दिसतील. भाजपा, शिंदे गट व दादा गट आणि काँग्रेस, उद्धव सेना व पवारांची राष्ट्रवादी यांच्यात मुख्य सामना होऊ शकेल. विरोधकांच्या ऐक्यामुळे 2014 ची लोकसभा निवडणूक वाटते तितकी सोपी नाही, हे भाजपाचे नेतृत्व ओळखून आहे. त्याकरिता फारसे अनुकूल वातावरण नसलेल्या महाराष्ट्रात हा सत्तेचा अकल्पित त्रिकोण घडवून आणण्यात आला आहे. हा त्रिकोण सत्तेसाठी सोयीचा वाटत असला, तरी यासाठी करावा लागणारा त्यागही तितकाच मोठा आहे नि तो प्रामुख्याने भाजपाच्या निष्ठावंतांनाच करावा लागत आहे. हे दुर्दैवी होय. मंत्रिपद वाटपात राष्ट्रवादीला मानाचे स्थान देण्यात आल्याने भाजपाचे आमदार कुठल्या कुठे फेकले गेले आहेत. त्याचबरोबर आशा लावून बसलेल्या शिंदे गटाच्या चिंताही वाढलेल्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सरकार 100 टक्के स्थिर झाले असले, तरी या त्रांगड्यातून निर्माण होणारा असंतोष भविष्यासाठी मारक ठरू शकतो. काँग्रेस, उद्धव सेना व पवारांच्या राष्ट्रवादीतही पूर्वीपासून अंतर्विरोध आहेत. मात्र, सोबत असून सत्ताधाऱ्यांना डोळा मारणारे दादा अंतिमत: तिकडे गेल्याने आघाडीतील संभ्रम दूर झाला म्हणायचा. उद्धव आणि राज यांच्या एकत्रिकरणाच्या चर्चा नेहमीच होत असतात. प्रत्यक्षात तसे झाले, तर तो चमत्कारच असेल. अजितदादांचा हर्षवर्धन पाटील वगैरे मंडळींशी असलेला संघर्ष सर्वश्रुत आहे. त्यामुळे ही मंडळी तिकडे किती रमतील, हाही प्रश्नच. दुसऱ्या बाजूला सत्तेचा हा सारीपाट पवार यांनीच घडविल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जाते. पवारांचे धक्कातंत्री राजकारण व विश्वासार्हता पाहता अशी साशंकता निर्माण होणे स्वाभाविकच. त्यामुळेच सेनाफुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्याइतकी मोठी सहानुभूती पवारांना मिळालेली दिसत नाही. तथापि, दांडगा संपर्क, जनतेची नाडी समजण्यासाठी लागणारी कुशाग्र बुद्धी ही पवार यांची बलस्थाने आहेत. त्यामुळे वय, तब्येतीवर मात करून वारे पुन्हा आपल्या बाजूकडे वळविण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. रोहित पवार, आर. आर. यांचे सुपुत्र रोहित पाटील, जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांच्यासह तऊण नेतृत्वाची फौज सोबतीला घेऊन पवार पुन्हा मैदानात उतरले आहेत. काही अपवाद वगळता अनेक जिल्ह्यांतील नेते, पदाधिकारी त्यांच्यासोबत असल्याचेही दिसते. त्यामुळे महाशक्ती दिमतीला असूनही दादांची कसोटी लागेल. महाराष्ट्राला काका-पुतण्यांमधील संघर्ष नवीन नाही. मात्र, अभंग मानल्या जाणाऱ्या पवार घराण्यात फूट पडली, यावर अजूनही कुणाचा विश्वास बसत नाही, अशी स्थिती आहे. या सगळ्यात आपला अभिमन्यू झाला असल्याची सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे. सत्तेचे हे महाभारत पुढे काय वळण घेते, तेच पहायचे.








