
प्रतिनिधी /काणकोण
काणकोणात दापट-माशे येथे काका व पुतण्या यांच्यात झालेल्या भांडणात पुतण्याने सुरीहल्ला करून काकाचा खून करण्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी सकाळी 7.20 च्या दरम्यान घडल्याची माहिती काणकोण पोलिसांनी दिली. मयत काकाचे नाव जानू खरात (वय 44) असे असून पुतण्याचे नाव अजय खरात (वय 25) असे आहे. तपासात दिसून आल्याप्रमाणे पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या दोघांमध्ये रविवारी सकाळी बाचाबाची सुरू झाली. वाढलेल्या भांडणात अजय खरात याने काकाच्या पोटावर व अन्यत्र सुरीने वार केले. त्यात काकाचा मृत्यू झाला. अजय खरात याला काणकोण पोलिसांनी अटक केली असून जानू खरात याचा मृतदेह मडगावच्या जिल्हा इस्पितळात शवचिकित्सेकरिता पाठविण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास काणकोणचे उपनिरीक्षक रामचंद्र नाईक हे करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय खरात हा विदेशी जहाजावर नोकरीला होता व विश्रांतीकरिता काही दिवसांपूर्वीच दापट येथील घरी आला होता. अजयला आई व बहीण असा परिवार आहे, तर मयत जानू खरात याच्या पश्चात आई, पत्नी व मुलगे असा परिवार आहे.









