सातारा :
गॅलक्सी इंटरनेट सर्व्हिसेस या कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून तीन मेहुण्यांनी दाजीची 25 लाखांची फसवणूक केली आहे. संजय प्रल्हाद गंधाले (वय 52, रा. त्रिपुटी ता. कोरेगाव) असे फसवणूक झालेल्या दाजीचे नाव आहे. याच संजय गंधाले यांच्या तक्रारीवरून योगेश मोहन तोरडमल, सुहास तोरडमल (शिरढोण, ता. कोरेगाव), गोरखनाथ सुभाष घाडगे (कवडेवाडी ता. कोरेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
संजय गंधाले हे सुरक्षा रक्षकांची नोकरी करत असून सन 2021 मध्ये त्यांना योगेश, सुहास, गोरखनाथ यांनी गॅलेक्सी इंटरनेट कंपनी शाखा, सातारा यामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून संजय यांनी वेळोवेळी 25 लाख रूपये चेकद्वारे रक्कम दिली. त्या रक्कमेवर कोणताही परतावा दिला नाही. शिवाय संजय यांच्या मुलाला नोकरीला लावतो असे सांगितले होते. परंतु अद्याप त्याला नोकरीला लावले नाही. याबाबत त्यांच्याकडे वारंवार विचारणा केली. परंतु त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संजय गंधाले यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली.








