कोल्हापूर :
यादवनगर येथील गुन्हेगार मामाने त्याच्या साथिदाराच्या मदतीने पाच वर्षाच्या भाचीचे अपहरण केले होते. या प्रकरणाचा कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तांत्रिक आणि खबऱ्यांच्या मदतीने तपास करुन, दोघा अपहरणकर्त्यांना निपाणी (जि. बेळगाव) परिसरात जेरबंद केले. गुन्हेगार संतोष सुरेश माळी, प्रथमेश सतीश शिंगे (दोघे रा. नवीन वसाहत, यादवनगर, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. त्याच्या तावडीतून अपह्त बालिकेची पोलिसांनी सुखरुप सुटका केली. याबाबत राजारामपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, संशयित संतोष माळी हा यादवनगर भागातील सराईत गुन्हेगार आहे. त्याला असणाऱ्या दारूच्या व्यसनाला कंटाळून त्याची पत्नी नोव्हेंबर त्याला सोडून गेली . आपल्या पत्नीला पळवून लावण्यात बहिणी नकुशा कुमार चव्हाण ही जबाबदार आहे. त्याचबरोबर पत्नी सध्या कुठे आहे. हे तिला असून ती सांगत नसल्याने तो तिच्यावर चिडून होता. आपल्या पत्नीची माहिती बहिणीकडून घेण्यासाठी तिच्या पाच वर्षाच्या मुलीच्या अपहणाचा कट त्याने रचला होता. यामध्ये त्याने प्रथमेश शिंगेला सहभागी करुन घेतले.
त्याप्रमाणे माळीने, साथिदार शिंगेच्या मदतीने 3 डिसेंबर रोजी दुपारी राजारामपूरी येथील शाहु नगर येथे बहिणी नकुशा तिच्या पाच वर्षाची मुली बरोबर आलेली पाहिले. या दोघांनी तिच्या पाच वर्षाच्या मुलीला जबरदस्तीने हिसकावून घेवून दुचाकीवरुन पळवून नेले. या घडल्या प्रकाराबाबत नकुशाने राजारामपूरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
याची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत अपहरणकर्त्यांचा तत्काळ समांतर तपास सुरु केला. दरम्यान माळीने निपाणी येथून बहिण नकुशाला फोन करुन, माझ्या पत्नीला समोर आण, तिचा पत्ता सांग अन्यथा तुझ्या मुलीचा मुडदा पाडतो, अशी धमकी दिली. दरम्यान पोलिसांनी अपहरकर्त्यांचा खबऱ्यांमार्फत शोथ सुरु केला. यावेळी माळीने शिंगेला निपाणी (जि. बेळगाव) येथील तवंदी घाटात सोडून, तो मुलीला घेऊन निपाणीच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. त्यावरुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांचे पथक तवंदी घाटात गेले.
येथे शिंगेला ताब्यात घेण्यात त्यांना यश आले. त्याच्या मदतीने माळीचा शोध सुरु केला. यावेळी तो निपाणी येथील अर्जुननगर भागात थांबल्याचे समजले. त्या परिसरावर पोलिसांनी तत्काळ छापा टाकला. त्याला ताब्यात घेत अपहृत मुलीची सुखरुप सुटका केली. त्यानंतर पोलिसांनी माळी आणि शिंगेला अटक करुन गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली. या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, अंमलदार वैभव पाटील, गजानन गुरव, महेंद्र कोरवी, योगेश गोसावी, सायबरचे सुहास पाटील आदीचा सहभाग होता.
.. अन् बालिका बिलगली आईला
मामाने साथिदाराच्या मदतीने पाच वर्षाच्या भाचीचे अपहरण केले. या प्रकरणातील संशयितांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना बारा तासानंतर यश आले. तसेच बालिकेची सुटका करुन, तिच्या आईच्या ताब्यात दिले. यावेळी तिने आईला पाहताच आई अशी हाक मारुन, तिच्या कुशीत जाऊन बिलगली.








