अफगाणिस्तान क्रिकेट मंडळ ‘एनओसी’ जारी करण्याची शक्यता कमी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अफगाणिस्तान क्रिकेट मंडळ मुजीब उर रहमान, नवीन उल हक आणि फझलहक फाऊकी यांना आगामी दोन वर्षांसाठी ना हरकत दाखले (एनओसी) देण्याची शक्यता नसून यामुळे इंडियन प्रीमियर लीगच्या 2024 च्या हंगामातील त्यांच्या सहभागाबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. मंडळाच्या एका निवेदनानुसार, त्यांनी या खेळाडूंशी 2024 सालासाठी वार्षिक करार करणे पुढे ढकलण्याचा पर्याय निवडला आहे.
1 जानेवारीपासून लागू होणाऱ्या केंद्रीय करारातून मुक्त करण्याच्या त्यांच्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आला आहे. कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूवा या प्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी एक समिती मंडळाने स्थापन केली आहे. ‘या खेळाडूंच्या केंद्रीय करारावर स्वाक्षरी न करण्याच्या आग्रहामागे व्यावसायिक लीगमधील त्यांचा सहभाग आहे. अफगाणिस्तानसाठी खेळणे हे एक राष्ट्रीय कर्तव्य असून त्यापेक्षा त्यांनी वैयक्तिक हितांना प्राधान्य दिले आहे, असे मंडळाने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे. करारातून मुक्त करण्याची विनंती केल्याने या खेळाडूंवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे.
अफगाणिस्तान आता भारताविऊद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत सहभागी होणार असून त्यातील पहिला सामना 11 जानेवारी रोजी मोहालीमध्ये, त्यानंतर दुसरा सामना 14 जानेवारी रोजी इंदूरमध्ये आणि तिसरा सामना 17 जानेवारी रोजी बेंगळूरमध्ये होईल. नुकत्याच झालेल्या आयपीएल-2024 च्या लिलावात मुजीबला कोलकाता नाईट रायडर्सने 2 कोटी ऊपयांना करारबद्ध केलेले असून नवीनला लखनौ सुपर जायंट्सने आणि फाऊखीला सनरायझर्स हैदराबादने कायम ठेवले ओ.
एसीबीने असेही सांगितले आहे की, त्यांच्या विशेष समितीने तीन कलमी शिफारस केली आहे. त्यानुसार, 1 जानेवारी, 2024 पासूनच्या एका वर्षासाठीच्या केंद्रीय करारासाठी हे तीन खेळाडू पात्र राहणार नाहीत. गरज लागेल तेव्हा त्यांच्या सहभागाविषयी विचार करण्यात येईल आणि निर्णय घेण्यात येईल. मंडळाने या तीन खेळाडूंना दिलेली ‘एनओसी’ तत्काळ मागे घेण्यात येत असल्याचेही घोषित केले आहे.









