शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांची माहिती : राज्यात 1,695 शाळा अनधिकृत
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील अनधिकृत शाळा बंद करण्यासंबंधी कार्यवाही करून 16 ऑगस्टपूर्वी अहवाल सादर करण्याची सूचना शिक्षण खात्याने जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना दिली होती. बुधवारी यासंबंधीचे पत्रक जारी करण्यात आले होते. राज्यातील 1,695 अनधिकृत शाळा असून त्या टप्प्याटप्प्याने बंद केल्या जातील, अशी माहिती शालेय शिक्षण आणि साक्षरता खात्याचे मंत्री मधू बंगारप्पा यांनी दिली.
बेंगळूरमध्ये कर्नाटक खासगी शाळा व्यवस्थापन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. विविध प्रकारचे परवाने न घेता सुरू करण्यात आलेल्या शाळांसाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांनाच जबाबदार धरले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
खासगी शाळा व्यवस्थापन संघटनेच्या सदस्यांनी आपल्या समस्या माझ्यासमोर मांडल्या आहेत. तसेच बेकायदेशीरपणे सुरू असणाऱ्या खासगी शाळांविषयी तक्रार केली आहे. समस्या सोडविण्यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. लवकरच सरकार समस्यांवर तोडगा काढेल, असे आश्वासन मधू बंगारप्पा यांनी दिले.
राज्यात 1695 अनधिकृत शाळा आहेत. या शाळांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या शाळा त्वरित बंद करणे शक्य नाही. अनेक शाळांनी परवानगी न घेता पुढील वर्ग सुरू केले आहेत. 190 शाळांनी योग्य पद्धतीने परवानगी न घेता अन्यत्र स्थलांतर केले आहे. अनधिकृतपणे सुरू असणाऱ्या शाळा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 14 ऑगस्टपूर्वी अनधिकृत शाळा बंद करण्याचा आदेश शिक्षण खात्याने 9 ऑगस्ट रोजी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना दिला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.









