केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पत्र महानगरपालिका-पोलीस आयुक्तांकडे वर्ग
बेळगाव : मागील अनेक वर्षांपासून बेळगावमधील प्रादेशिक कार्यालय तसेच महानगरपालिकेसमोर अनधिकृत ध्वज फडकविला जात आहे. याविरोधात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने देशाच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहिले होते. याची दखल घेत हे संबंधित पत्र मनपा आयुक्त व पोलीस आयुक्तांना वर्ग करण्यात आले असून ते या ध्वजाबाबत कोणती भूमिका बजावतात, याकडे बेळगावकरांचे लक्ष लागले आहे. कोणतीही अधिकृत मान्यता नसताना प्रादेशिक कार्यालयासमोर ध्वज फडकविण्यात आला. असाच ध्वज काही वर्षांपूर्वी महापालिकेसमोरही उभा केला. केवळ मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी जागोजागी अनधिकृत ध्वज फडकविले जात आहेत. यासंदर्भात म. ए. समितीतर्फे वारंवार निवेदन देऊनही जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व मनपा आयुक्तांच्याकडून कोणतीही कार्यवाही झाली नव्हती.
म. ए. युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी शासकीय कार्यालयावर राष्ट्रध्वजाशेजारी अनधिकृत ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याची तक्रार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती. यासंदर्भात कर्नाटकच्या मुख्य आयुक्तांनी कार्यवाही करण्याचे निर्देश मार्च महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांना केले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. अंकुश केसरकर यांनी अनधिकृत ध्वज काढण्याबाबत कोणती पावले उचलली, याची माहिती माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागविली. जिल्हाधिकाऱ्यांनी अनधिकृत ध्वजाबाबत कार्यवाही करून हे पत्र मनपा व पोलीस आयुक्तांना पाठविल्याचे म्हटले आहे. आता मनपा व पोलीस आयुक्त कोणती भूमिका घेतात? हे पहावे लागणार आहे.









