वृत्तसंस्था /लंडन
इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत पदार्पण करणारे भारताचे गोलंदाज जयदेव उनादकट आणि जयंत यादव यांनी पहिल्याच सामन्यात दर्जेदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत जयदेव उनादकट ससेक्स तर जयंत यादव मिडलसेक्स क्लबकडून खेळत आहे. या दोघांनीही पहिल्या समन्यात प्रत्येकी 5 गडी बाद केले. चालू वर्षाअखेर द. आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाच्या दौऱ्यावेळी कसोटी मालिकेकरिता कदाचित उनादकटची निवड केली जाईल असे वाटते. ससेक्स आणि लिसेस्टरशायर यांच्यांतील सामन्यात खेळताना वेगवान गोलंदाज उनादकटने पहिल्या डावात 23 धावात 3 तर दुसऱ्या डावात 94 धावात 6 असे एकूण 9 गडी बाद करून आपल्या संघाला 15 धावांनी विजय मिळवून दिला. संसेक्स संघाचे नेतृत्व चेतेश्वर पुजाराकडे आहे. मिडलसेक्स आणि लँकेशायर यांच्यातील सामन्यात मिडलसेक्स संघाकडून खेळताना फिरकी गोलंदाज जयंत यादवने 131 धावात 5 गडी बाद केले. हा सामना अनिर्णित राहिला.









