वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसी एलिट पॅनलच्या पंचांमधील भारताचे एकमेव प्रतिनिधी नितीन मेनन यांनी वैयक्तिक कारणांमुळे या महिन्यात पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पंच म्हणून काम करण्यास नकार दिला आहे.
आयसीसीने बुधवारी 15 सामन्यांच्या अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली, ज्यामध्ये तीन सामनाधिकारी आणि 12 पंचांचा समावेश आहे. 19 फेब्रुवारी रोजी कराची येथे सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी ही निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू डेव्हिड बून, श्रीलंकेचे रंजन मदुगले आणि झिम्बाब्वेचे अँड्यू पायक्रॉफ्ट यांना आठ संघांच्या या स्पर्धेसाठी सामनाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ही स्पर्धा पाकिस्तानमधील तीन ठिकाणी कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे होणार आहे, तर भारत त्यांचे सर्व सामने सुरक्षेच्या कारणास्तव दुबईमध्ये खेळेल. 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविऊद्धच्या सामन्याने भारताची मोहीम सुरू होईल.
आयसीसी मेनन यांना चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यादीत समाविष्ट करू इच्छित होती, परंतु वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी पाकिस्तानला न जाण्याचा निर्णय घेतला, असे बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले. आयसीसी तटस्थ पंच नियुक्त करण्याचे धोरण पाळत असल्याने मेनन दुबईतील सामन्यांमध्ये पंचगिरी करू शकले नसते. आयसीसीने पंच व सामनाधिकारी यांची यादी जाहीर करताना मेनन यांच्यावर कोणतीही टिप्पणी केली नाही. दरम्यान, स्पर्धेसाठी निवडलेले तिन्ही सामनाधिकारी अनुभवी आहेत. बून यांनी 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भाग घेतला होता, तर मदुगले यांनी 2013 च्या अंतिम फेरीत जबाबदारी सांभाळली होती. पायक्रॉफ्ट यांनीही 2017 च्या स्पर्धेत भाग घेतला होता.









