रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्हा परिषद आणि सिंधुरत्न समृद्धी योजनेतून महाराष्ट्र राज्यातील पहिलाच प्रकल्प कोतवडेच्या एकता प्रभाग संघाच्या माध्यमातून सत्यात उतरला आहे. गुऊवारी येथील राई बंदरात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हाऊसबोटचे लोकार्पण झाले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान, उमेदच्या महिलांनी चालवलेला हा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशालाही एक आदर्श घालून देणारा असल्याचे मत सामंत यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, डीआरडीएचे प्रकल्प संचालक विजय जाधव, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, बाबू म्हाप, बिपीन बंदरकर, विजय पाटील, सतीश शेवडे, सरपंच श्रृती शितप आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला एकता महिला प्रभाग संघांच्या स्वरा देसाईंसह विविध बचतगटांचा महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
- हाऊसबोटचा रत्नागिरी पॅटर्न राज्यात आदर्शवत ठरेल
सामंत म्हणाले, स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी बचतगटाच्या माध्यमातून देशातील पहिली हाऊस बोट आज इथे आहे. जिह्यामध्ये अशा आणखी 4 हाऊस बोटी येणार आहेत. हा प्रकल्प अतिशय चांगला आहे. निसर्गरम्य वातावरणात तो निश्चितपणे देशात आदर्शवत ठरेल. हा रत्नागिरी पॅटर्न राबवण्यासाठी सर्वजण पुढाकार घेतील. काश्मिर आणि केरळनंतर रत्नागिरीतही हाऊस बोटी आहेत, असे अभिमानाने सांगता येईल. महिला प्रभाग संघांना देण्यात आलेली टुरिस्ट वाहनेही सातत्याने आरक्षित असतात. आणखी 6 वाहने द्यायची आहेत. ही वाहने चालवणारे चालक व वाहक दोघीही महिला असाव्यात. त्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी माझी राहील. सध्याच्या युगात महिला पायलट सर्वात उत्तम विमाने चालवत आहेत. त्याप्रमाणे हाऊस बोटीची कॅप्टन देखील महिला असावी. जिह्यामध्ये सुरू केलेले उपक्रम पुढे चालू ठेवणे, ही देखील आपली जबाबदारी आहे. महिला भगिनींनी उद्योगधंद्यांकडे वळले पाहिजे, त्यासाठी मानसिकता असावी. हाऊस बोटीच्या प्रकल्पाजवळ खाऊ गल्ली तयार करा. त्यासाठी पुढाकार घ्यावा. न्याहरी निवास योजना चळवळ म्हणून राबविण्यासाठी उमेदने पुढाकार घ्यावा. त्यामध्ये महिलांनी चांगले काम करावे, असेही पालकमंत्री सामंत म्हणाले.








