उमेद फाउंडेशन तर्फे शिष्यवृत्ती प्रदान सोहळा तळेरे येथे संपन्न
तळेरे
उमेद फाउंडेशन ही संस्था सामाजिक बांधिलकी स्वीकारून कार्यरत आहे.विविध क्षेत्रात काम करीत असतांना गरीब,गरजू,होतकरु विद्यार्थ्यांच्या संघर्षमय जीवनाला मदतीचा हात म्हणून उमेद शिष्यवृत्ती देण्यात येते.आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत.सर्वाचा विश्वास आणि संघटीत वृत्ती यामुळेच मोठी मजल मारता आली.विद्यार्थ्याना शैक्षणिक मदत म्हणून खारीचा वाटा उचलत आहे.”मायेचे घर” ही संकल्पना प्रत्यक्षात साकारुन विद्यार्थ्यांना नवी उमेद देण्याचा प्रयत्न करीत आहे असे प्रतिपादन उमेद फाउंडेशनचे संस्थापक प्रकाश गाताडे यांनी केले.
उमेद फाउंडेशन तर्फे दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते.आतापर्यंत 230 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृती प्रदान करण्यात आली आहे. याही वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 83 गरजू विद्यार्थ्यांना निश्चल इस्रानी फाउंडेशन व उमेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने शिष्यवृत्ती देण्याचा कार्यक्रम वामनराव महाडिक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,तळेरेच्या डॉ.एम्.डी.देसाई सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी श्री.गाताडे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावरती दारुम सरपंच कु.तेजस्वी लिंगायत, ओझरम उपसरपंच प्रशांत राणे,राजापूर अर्बन बँक तळेरे शाखेचे शाखा व्यवस्थापक दुर्गेश बिर्जे, मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर, तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष व जेष्ठ पत्रकार उदय दुधवडकर, सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव, पत्रकार संजय खानविलकर,सामाजिक कार्यकर्त्या सौ.श्रावणी मदभावे, पत्रकार गुरुप्रसाद सावंत, प्रा.हेमंत महाडीक, सतीश मदभावे, सुहास पाताडे, माजी सरपंच प्रवीण वरुणकर, युवा चित्रकार अक्षय मेस्त्री, तातोबा डांगे, सतेज पाटील, प्रा.आशा कानकेकर , अभय पाटील, जे.बी.पाटील, जे.डी.पाटील,आर.आर.पाटील,श्री.पचकर,मेघा नाळे,शोभा पाटील हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक मध्ये सागर पेंडूरकर यांनी उमेदचे विविध उपक्रम व उमेद शिष्यवृत्ती विषयी सविस्तर माहिती दिली.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती देवीला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना निवड पत्र व रेड क्रॉस इंडियातर्फे देण्यात आलेली स्वच्छता कीट मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.उमेदचे सामाजिक कार्य आदर्शवत आणि उल्लेखनीय असे आहे.विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्यामध्ये नवी उमेद निर्माण करण्याचे कार्य करीत आहे.या सामाजिक कार्यात आम्ही देखील सहभागी होऊ असे मत वामनराव महाडिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर यांनी व्यक्त केले.
तसेच तळेरे येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी उमेदचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर पसरूदे आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.तळेरे येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ.श्रावणी मदभावे यांनी आपल्या मनोगतातून उमेदच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले व आपणही उमेदमध्ये सहभागी होऊ अशी भावना व्यक्त केली.तसेच यावेळी त्यांनी उमेदचे अध्यक्ष प्रकाश गाताडे यांना नारळाच्या करवंटी पासून स्वतः तयार केलेली राखी बांधून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
वामनराव महाडिक संस्थेतर्फे प्रकाश गाताडे व जाकीर शेख यांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी राजापूर अर्बन बँक तळेरे शाखेचे शाखा व्यवस्थापक दुर्गेश बिर्जे,प्रा.हेमंत महाडिक तसेच पत्रकार उदय दूदवडकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करुन उमेद फाऊंडेशन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.सौ.स्वाती पाटील यांनी उमेदच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली.संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जाकीर शेख यांनी केले तर शेवटी आभार प्रदीप नाळे यांनी मानले.









