उंब्रज :
कराड तालुक्यातील उंब्रज पोलीस ठाण्याच्या वतीने, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी उंब्रज शहरासह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावांमध्ये रूट मार्चचे आयोजन करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, दोन पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि महिला पोलिसांचा रूट मार्चमध्ये सहभाग होता.
गणेशोत्सव आणि येत्या सण-उत्सवांच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उंब्रज पोलिसांकडून विविध गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांशी बैठका घेण्यात आल्या. या बैठकीत जिल्हाधिकारी, सातारा यांनी जाहीर केलेल्या नियमावलीचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांनी दिला आहे.
दरम्यान, बुधवारी गणपतीची स्थापना होणार असल्याने, मंगळवारी उंब्रज शहरामध्ये रूट मार्च पार पडला. या रूट मार्चदरम्यान उंब्रज बाजारपेठ, सेवा रस्ते, लोकवस्ती परिसर, अंतर्गत रस्ते, पाटण-तिकाटणे मार्ग आणि सेवा रस्त्यांवरून पोलिसांनी संचलन केले. या रूट मार्चमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








