यातूनच ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे
उंब्रज : किरकोळ कारणावरुन घरात वादावादी करणाऱ्या एका व्यक्तीला कुटुंबातील सदस्यांनी संगनमताने संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रमेश कोंडीबा खरात (वय ४५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सवारवाडी कडवे बूद्रक (ता. पाटण) येथे ही घटना घडली असून याप्रकरणी पत्नी, मुलगी, मुलगा यांच्यावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवार (दि २६ जुलै) रोजी सकाळी ८.३० वाजता ही घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे. मयत व्यक्ती नेहमी घरच्यांना शिविगाळ करुन भांडण करायचा. मद्यपान करुन त्रास देत होता. आवडीची भाजी केली नाही अशा किरकोळ कारणांवरुन पत्नीस व मुलीस मारहाण करत होता. यातूनच ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
याप्रकरणी मृताचा मुलगा हरिष खरात (वय २२), पत्नी लक्ष्मी खरात (वय ४२) व मुलगी अश्वनी उमेश शिंदे (वय २४) रा. नागठाणे, जि.सातारा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी, रमेश खरात हा व्यसनी होता व तो किरकोळ कारणावरुन नेहमी घरात वादावादी करुन त्यांना शिविगाळ करुन भांडण करत असल्याचा जबाब दिला आहे. 25 जुलै रोजी रात्री आवडीची भाजी केली नाही या किरकोळ कारणावरुन पत्नी लक्ष्मी खरात व मुलगी अश्वनी शिंदे यांना मारहाण केली होती.
त्यामुळे या रोजच्या त्रासाला कंटाळून त्या तिघांनी संगणमत करुन लाकडी दांडक्याने व हाताने रमेश खरात यास हातापायावर व इतरत्र जबर मारहाण केली. मारहाणीमुळे गंभीर जखमी झाल्याने तो घरात बेशुद्धावस्थेत पडला होता. त्याला कोणत्याही वैद्यकीय उपचाराकरता नेण्यात आले नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला, अशी फिर्याद पोलीस काॅन्सटेबल राजकुमार भिमाशंकर कोळी यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. तिघांच्या विरुद्ध भा.न्या. संहिता २०२३ चे कलम १०३(१),३५) प्रमाणे सरकारतर्फ फिर्याद दाखल करण्यात आली आहे.








