वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फेब्रुवारी 2020 मध्ये राष्ट्रीय राजधानीत झालेल्या दंगलीच्या कथित कटाशी संबंधित यूएपीए प्रकरणात उमर खालिद, शर्जील इमाम, गुल्फिशा फातिमा आणि मीरान हैदर यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने 19 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने खटल्यासंबंधीच्या फाईल्स आपल्याला खूप उशिरा मिळाल्याचे सांगत सुनावणी पुढील आठवड्यापर्यंत लांबणीवर टाकली. याचिकाकर्त्यांनी 2 सप्टेंबरच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे.
उच्च न्यायालयाने खालिद आणि इमामसह नऊ जणांना जामीन नाकारला होता. नागरिकांच्या निदर्शनांच्या नावाखाली ‘षड्यंत्रकारी’ हिंसाचाराला परवानगी देता येणार नाही, असे सांगत उच्च न्यायालयाने खालिद, इमाम, फातिमा, मोहम्मद सलीम खान, शिफा उर रहमान, अतहर खान, मीरान हैदर, अब्दुल खालिद सैफी आणि शादाब अहमद यांना जामीन नाकारला होता. तत्पूर्वी अन्य एक आरोपी तस्लीम अहमद याचा जामीन अर्ज 2 सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयाच्या स्वतंत्र खंडपीठाने फेटाळला होता.









