वृत्तसंस्था/ भोपाळ
भाजपच्या दिग्गज नेत्या आणि मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती स्वत:चा राजकीय एकांतवास संपुष्टात आणणार असल्याची चर्चा आहे. 2029 ची लोकसभा निवडणूक लढण्यास तयार असून झाशी माझी असून मी येथूनच निवडणूक लढवू इच्छिते, असे उमा भारती यांनी म्हटले आहे. उमा भारती यांनी यापूर्वी स्वत:च राजकारणापासून अंतर राखले होते. परंतु आता त्या स्वत:च राजकीय एकांत संपविणार असल्याचे समजते. उमा भारती यापूर्वी झाशी, महोबा यासारख्या भागांमध्ये सक्रीय राहिल्या आहेत.
उमा भारती या लोधी समुदायाशी संबंधित असून झाशी आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये या समुदायाचे प्रमाण अधिक आहे. पश्चिम उत्तरप्रदेशपासून बुंदेलखंडपर्यंत लोधी समुदायाची लोकसंख्या लक्षणीय आहे. कल्याण सिंह याच समुदायाचे नेते होते आणि आता त्यांच्या अनुपस्थितीत उमा भारती या समुदायाचे नेतृत्व करू पाहत असल्याचे मानले जातेय. पक्षाला 2029 ची लोकसभा निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे कळविले आहे. परंतु मी केवळ झाशीतूनच निवडणूक लढविणार, असे उमा भारती यांनी म्हटले आहे.









