पुणे / प्रतिनिधी :
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना स्वाभिमानी संघटनेच्या शिस्तपालन समितीने अल्टिमेटम दिला आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत तुपकर यांनी समितीसमोर त्यांची बाजू मांडावी, असा निर्णय पुण्यामध्ये झालेल्या स्वाभिमानी संघटनेच्या शिस्तपालन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, वेगवेगळे पक्ष व संघटना फोडणे हा भाजपाचा अधिकृत कार्यक्रम असल्याची टीका स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
मागील काही महिन्यांपासून रविकांत तुपकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असून, शेट्टी यांच्यावर त्यांनी उघडपणे टीका केली होती. नेतृत्व दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन समितीची पुण्यात बैठक पार पडली. या बैठकीसाठी तुपकर यांना आमंत्रण देण्यात आले होते. पण ते या बैठकीला गैरहजर राहिले. तुपकरांनी केलेल्या आरोपांवर बैठकीत चर्चा केली गेली. या बैठकीनंतर स्वाभिमानी संघटनेच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष जालिंदर पाटील आणि राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेतली व संघटनेची भूमिका जाहीर केली.
येत्या 15 ऑगस्टपर्यंत रविकांत तुपकर यांना समिती वेळ देत आहे. त्यांनी आपल म्हणणे समितीसमोर नोंदवावे म्हणजे समितीला निर्णय घेता येईल. तुपकर यांनी संघटनेसोबतच राहावे. 15 तारखेपर्यंत तुपकर आले नाहीत. तर समिती पुढचा निर्णय घेईल, असे जालिंदर पाटील यांनी सांगितले.
शिस्तपालन समिति जो निर्णय घेईल तो मान्य : राजू शेट्टी
दरम्यान, राजू शेट्टी म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून रविकांत तुपकर यांनी वेगळी भूमिका मांडायला सुरूवात केली आहे. आमच्या शेतकरी चळवळीसाठी ती हानिकारक बाब होती. म्हणून आज तातडीची बैठक बोलावली होती. त्यांना आमंत्रण पाठवले होते. त्यांनी या बैठकीला येणे अपेक्षित होते. पण ते आले नाहीत मी आजच्या बैठकीत सगळे खुलासे केले आहेत. तुपकर यांचा रोख माझ्यावर होता. त्यामुळे शिस्तपालनचे लोक निर्णय घेताना मी निर्णय प्रक्रियेत सहभागी होणार नाही. पाच जणांची समिती आम्ही स्वाभिमान शेतकरी संघटनेमध्ये नेमली आहे. समितीने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले आहे, समिती जो निर्णय घेईल तो मान्य असेल, असे शेट्टी यांनी सांगितले.
संघटना फोडणे हा भाजपाचा अधिकृत कार्यक्रम
बैठकीपूर्वी प्रसार माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी यांनी तुपकर यांच्या या बंडामागे भाजप असल्याचा संशय व्यक्त केला आहे. शेट्टी म्हणाले, पक्ष-संघटना फोडणे हा तर भाजपाचा अधिकृत कार्यक्रम आहे. राष्ट्रीय समाज पार्टीचे काय झाले? शिवसेनेचे काय झाले? त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे काय झाले? आणि यापूर्वी स्वाभिमानी संघटनेच्या बाबतीतही काय झाले, हा जुना इतिहास आहे. त्यामुळे तो त्यांचा अधिकृत कार्यक्रम आहे. त्यामुळे यामागेही भाजप असणार, हे म्हणण्यास जागा आहे.
स्वाभिमानीचाही दुसरा गट?
मिळालेल्या माहितीनुसार रविकांत तुपकर हे इतर कुठल्याही पक्षात प्रवेश न करता स्वाभिमानीचाच दुसरा गट स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे रविकांत तुपकर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.