अभ्यासक्रम सोडलेल्यांनाही परीक्षेसाठी अनुमती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आपल्याला जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा देण्याची संधी आहे, अशा समजुतीने ज्या विद्यार्थ्यांनी 5 नोव्हेंबर 2024 ते 18 नोव्हेंबर 2024 या कालावधीत आपले इतर अभ्यासक्रम सोडून या परीक्षेसाठी अभ्यासाला प्रारंभ केला आहे, त्यांना ही परीक्षा देण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे अशा इच्छुक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संयुक्त प्रवेश मंडळाने 5 नोव्हेंबर 2024 या दिवशी एक आदेश प्रसारित केला होता. त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांनी 2023, 2024 आणि 2025 या 12 वीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे, त्यांना जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा देता येणार होती. तथापि, त्यानंतर 13 दिवसांनी, अर्थात 18 नोव्हेंबर 2024 या दिवशी मंडळाने हा आदेश मागे घेतला होता आणि नवा आदेश प्रसारित केला होता. नव्या आदेशानुसार केवळ 2024 आणि 2025 मध्ये बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा देता येणार होती. आदेशाची प्रसिद्धी आणि तो मागे घेणे, या मधील 13 दिवसांच्या कालखंडात अनेक विद्यार्थ्यांनी पुन्हा जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा देण्यासाठी त्यांनी निवडलेले अन्य अभ्यासक्रम सोडून दिले होते. मात्र, मंडळाने आदेश मागे घेऊन नवा आदेश प्रसिद्ध केल्याने अशा विद्यार्थ्यांना फटका बसला होता. त्यामुळे अशांपैकी काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
संयुक्त प्रवेश मंडळाने काढलेला पहिला आदेश हा विद्यार्थ्यांना दिलेले ‘वचन’ (प्रॉमिस) होते, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता मंडळाने आपल्या पहिल्या आदेशात दिलेले ‘वचन’ पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे नोव्हेंबर 5 ते नोव्हेंबर 18 या कालावधीत ज्या विद्यार्थ्यांनी आपले इतर अभ्यासक्रम या परीक्षेसाठी सोडले आहेत, त्यांनाही जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा देण्याची संधी मिळणे आवश्यक आहे. परिणामी, 2023 मध्ये ज्यांनी बारावी परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि जे विद्यार्थी इतर अभ्यासक्रम सोडून या परीक्षेसाठी सज्ज होत आहेत, त्यांनाही ही परीक्षा देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांना या परीक्षेसाठी नोंदणी करण्याचा अधिकार आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
मंडळाच्या वतीने युक्तिवाद
संयुक्त परीक्षा मंडळाच्या वतीने महाधिवक्ता तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला. या वर्षीपर्यंत विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा केवळ दोनदा देता येत होती. तथापि, यावर्षी एक अपवाद या नात्याने 2023 च्या विद्यार्थ्यांनाही संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि, नंतर असे लक्षात आले आहे की 2023 च्या ज्या विद्यार्थ्यांनी इतर अभ्यासक्रम स्वीकारलेले आहेत, त्यांनीही त्या अभ्यासक्रमांकडे दुर्लक्ष करुन याच परीक्षेची तयारी करण्यासाठी अधिक वेळ दिला आहे. त्यामुळे त्यांना ही परीक्षा देण्याची तिसरी संधी मिळाली असून त्यांना तयारीसाठी 2024 आणि 2025 च्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक वेळ मिळाला आहे. म्हणून 2024 आणि 2025 च्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी मंडळाने नवा आदेश काढला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या युक्तिवादाला विरोध केला नाही. तथापि, एकदा मंडळाने आदेश प्रसिद्ध केल्यानंतर पुन्हा तो मागे घेण्यामुळे त्या आदेशावर विश्वास ठेवून ज्या विद्यार्थ्यांनी आपले अन्य अभ्यासक्रम सोडले, त्यांचाही विचार करावा लागणार आहे. म्हणून त्यांनाही यावेळी ही संधी मिळणे आवश्यक आहे, असे न्या. भूषण गवई आणि न्या. ए. जी. मसीह यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.









