वृत्तसंस्था/ अंकारा
युक्रेनच्या एका खासदाराने रशियाच्या प्रतिनिधीला ठोसा लगावला आहे. तुर्कियेच्या अंकारा शहरात सुरू असलेल्या ब्लॅक सी इकोनॉमिक कोऑपरेशनच्या बैठकीदरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. या बैठकीदरम्यान छायाचित्रणाचे सत्र सुरू होते. युक्रेनचे खासदार ऑलेक्झेंडर मारिकोव्स्की यावेळी युव्रेनचा ध्वज घेऊन उभे हेते, तेव्हा रशियाच्या प्रतिनिधीने त्यांच्या हातातील ध्वज हिसकावून घेत तो फेकला होता.
रशियाच्या प्रतिनिधीच्या या कृत्यामुळे युक्रेनचे खासदार मारिकोव्स्की संतापले. मारिकोव्स्की यांनी रशियाच्या प्रतिनिधीचा पाठलाग करत त्याला ठोसा लगावला आहे. या घटनेनंतर दोघांमध्ये वादावादी देखील झाली. मारिकोव्स्की यांनी या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
‘द कीव्ह पोस्ट’च्या एका पत्रकाराने हा व्हिडिओ शेअर केला आहे. 24 तासांत 30 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. संबंधित बैठकीत काळ्या समुद्राच्या क्षेत्रातील देशांचे प्रतिनिधी आर्थिक, तंत्रज्ञान आणि सामाजिक मुद्द्यांवर बहुपक्षीय तसेच द्विपक्षीय संबंध वृद्धींगत करण्यासाठी चर्चा करत होते. ब्लॅक सी इकोनॉमिक कोऑपरेशन ही संघटना 30 वर्षांपूर्वी म्हणजेच 1992 मध्ये स्थापन झाली होती.
पुतीन यांच्या निवासस्थानावर हल्ला
3 मे रोजी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला झाला होता. हा हल्ला युक्रेनने केल्याचा आरोप रशियाकडून करण्यात आला होता. तर युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी क्रेमलिनवरील ड्रोन अटॅक युक्रेनने केले नसल्याचे स्पष्ट केले होते.









