दक्षिण युक्रेनमधील त्या देशाचे एकमेव मोठे बंदर मारियोपोल ताब्यात घेतल्याचा दावा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केलेला आहे. मात्र, पाश्चिमात्य पत्रकारांच्या म्हणण्यानुसार अद्यापही येथे काही स्थानी युक्रेनचे सैन आणि नागरीक रशियाचा प्रतिकार करीत असून रशियाला या बंदराचा पूर्ण ताबा मिळालेला नाही.
हे बंदर ताब्यात घेतल्याचा रशियाचा दावा आहे. तथापि, रशियन सैन्य या पूर्ण बंदर आणि शहरावर ताबा मिळविण्याऐवजी केवळ येथील पोलाद निर्मिती प्रकल्प ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे. त्याला अद्याप या प्रयत्नात यश मिळालेले नसले, तरी युक्रेनचा प्रतिकारही काहीसा थंडावला आहे. हे शहर हातचे जाणार, अशीच युक्रेनची भावना झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे या शहराचा नाद सोडून अन्यत्र सुरक्षा व्यवस्था वाढविण्यासाठी हा देश प्रयत्न करीत आहे.
दक्षिण युक्रेनवर रशियाचे लक्ष
आतापर्यंत पूर्व युपेनवर लक्ष केंद्रीत केलेल्या रशियाने आता दक्षिण युक्रेनकडे मोर्चा वळविल्याचे युद्धभूमीवरुन वृत्तांत देत असणाऱया विदेशी पत्रकारांनी स्पष्ट केले आहे. रशिया संपूर्ण दक्षिण आणि पूर्व युक्रेनवर ताबा मिळवू इच्छितो, अशी घोषणा एका रशियन सैन्याधिकाऱयाने शुक्रवारी व्यक्त केली. शुक्रवारपासून रशियाने या दोन भागांवर पुन्हा तीव्र हल्ले चढविण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे या भागांच्या हानीमध्ये वाढ झाली आहे. नागरीकांचे स्थलांतर होतच आहे.
तुर्कस्थानचे मध्यस्थीचे प्रयत्न
तुर्कस्थानचे अध्यक्ष एर्डोगन यांनी युक्रेन आणि रशिया यांच्यात मध्यस्थी करण्याचा नव्याने प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आहे. ते लवकरच दोन्ही देशांच्या प्रमुखांशी चर्चा करणार आहेत. पुतीन आणि झेलेन्स्की यांची भेट तुर्कस्थानमध्ये घडवून आणण्याचा प्रयत्न आपण करु असे त्यांनी स्पष्ट केले.









