रशियाच्या सैन्याला सीमेपर्यंत मागे ढकलले
वृत्तसंस्था/ कीव्ह
युद्धादरम्यान युक्रेनच्या प्रत्युत्तरादाखलच्या हल्ल्यांदरम्यान रशियाचे सैनिक आता मागे हटू लागले आहेत. याचदरम्यान युक्रेनच्या सैनिकांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात रशियाचे सैनिक सीमेवर उभे असल्याचे दिसून येते. युक्रेनच्या सैनिक स्वतःच्या अध्यक्षांना आम्ही येथे पोहोचलो आहोत असे सांगत असल्याचे यात निदर्शनास येत आहे.
ऑस्ट्रियातील युक्रेनचे माजी राजदूत ओलेक्सेंडर शेरबा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. युक्रेनचे सैनिक रशियाच्या सीमेवर पोहोचल्याचे यात दिसून येते. यापूर्वी युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने एका सोशल मीडिया पोस्टद्वारे युक्रेनच्या टेरिटोरियल डिफेन्स फोर्सची तुकडी रशियाच्या सीमेवर पोहोचल्याचे सांगितले आहे.
ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने युक्रेनच्या स्थितीवर एक अहवाल जारी केला आहे. फेब्रुवारीनंतर रशियाच्या सैन्याला मोठे नुकसान झाले असून तो युद्धात मागे पडत आहे. पुढील 30 दिवसांमध्ये रशियाची ही स्थिती बदलण्याची शक्यता कमी असल्याचे यात म्हटले गेले आहे.
नाटोच्या विदेशमंत्र्यांची बैठक
जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये नाटोच्या विदेशमंत्र्यांची एक बैठक झाली आहे. यात जर्मनीच्या विदेशमंत्री एनालेना बारबॉक यांनी युक्रेनच्या स्वतःच्या रक्षणासाठी गरज असेपर्यंत आपण मदत करत राहणार असल्याचे म्हटले आहे. युक्रेन हे युद्ध जिंकू शकतो, युक्रेनियन सैनिक शूरपणे स्वतःच्या मातृभूमीचे रक्षण करत असल्याचे उद्गार नाटो प्रमुख जेन्स स्टोल्टेनबर्ग यांनी काढले आहेत.
8 गुप्त रुग्णालयरुपी रेल्वे
युक्रेन स्वतःच्या नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी 8 गुप्त रेल्वे चालवित आहे. बाहेरून निळय़ा आणि पिवळय़ा रंगाची ही ट्रेन सोव्हियत काळातील अनेक रेल्वेगाडय़ांपैकी एक आहे. या रेल्वेगाडय़ा युक्रेनच्या युद्धग्रस्त भागांमधून लाखो शरणार्थी आणि जखमी जवानांना हलविण्यास मदत करत आहेत. मागील महिन्यापासून या रेल्वेंद्वारे सुमारे 400 लोकांना वाचविण्यात आले आहे. प्रत्येक प्रवाशाला प्रंटलाइन नजीकच्या रुग्णालयांमध्ये एक बेड देण्यात आला आहे.









