ड्रोन्सद्वारे तुआप्से बंदरावर घडविला विध्वंस : ऑइल टर्मिनलने घेतला पेट
वृत्तसंस्था/ मॉस्को
युक्रेनने रविवारी रशियावर मोठा ड्रोन अटॅक केला आहे. या हल्ल्यात काळ्या समुद्रातील रशियाच्या तुआप्से बंदराचे मोठे नुकसान झाले आहे. हल्ला भीषण असल्याने बंदराच्या एका हिस्स्याला आग लागली आहे. यामुळे रशियन ऑइल टर्मिनल प्रभावित झाले आहे. तर हल्ल्यादरम्यान 164 युक्रेनियन ड्रोन आकाशातच नष्ट केल्याचा दावा रशियाच्या हवाई सुरक्षा विभागाने केला आहे.
युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यामुळे काळ्या समुद्रातील तुआप्से बंदरावर भीषण आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. तुआप्सेमधील ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जात आहे. हा हल्ला सैन्यरसद तोडण्याच्या युक्रेनच्या अभियानाचा हिस्सा आहे. हल्ल्यात कुठल्याही प्रकारच्या जीवितहानीचे वृत्त अद्याप प्राप्त झालेले नाही असे क्रास्नोडार प्रशासनाने सांगितले आहे. तुआप्से बाहेर असलेल्या सोस्नोनी गावात ड्रोन हल्ल्यामुळे एका इमारतीचे नुकसान झाले आहे.
ऑइल टर्मिनल अन् रिफायनरी लक्ष्य
कोसळणाऱ्या ड्रोनमुळे बंदराच्या सुविधांचे नुकसान होत आग लागली असल्याचे क्रास्नोडार क्षेत्राच्या प्रशासनाने सांगितले. हे बंदर तुआप्से ऑइल टर्मिनल आणि रोसनेफ्ट नियंत्रित तुआप्से ऑइल रिफायनरीचे केंद्र आहे. या दोन्ही ठिकाणांना युक्रेनने चालू वर्षात ड्रोन्सच्या माध्यमातून अनेकदा लक्ष्य केले आहे. वीज ग्रीडवरील रशियन हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल युक्रेनने रशियन रिफायनरी, डेपो आणि पाइपलाइन्सवर हल्ले वाढविले आहेत. या हल्ल्यांचा उद्देश इंधनाच्या पुरवठ्यावर दबाव निर्माण करणे, सैन्य लॉजिस्टिक्समध्ये अडथळे निर्माण करणे आणि रशियाच्या युद्धकालीन खर्चाला वाढविणे आहे.









