आण्विक प्रकल्प अन् फ्यूल टर्मिनलचे मोठे नुकसान
वृत्तसंस्था/ कीव्ह/मॉस्को
रशिया-युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कितीही प्रयत्न करत असले तरीही हे युद्ध थांबण्याची चिन्हे नाहीत. युक्रेनने रविवारी रशियावर मोठ्या प्रमाणावर ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यांमुळे रशियातील सर्वात मोठ्या आण्विक प्रकल्पांपैकी एक कुर्स्क आण्विक प्रकल्पाच्या रिअॅक्टरच्या क्षमतेत मोठी घट झाली असून प्रमुख उस्त-लुगा फ्यूल एक्सपोर्ट टर्मिनलमध्ये भीषण आग लागली आहे.
रशियाच्या क्षेत्रांमध्ये रविवारी युक्रनने भीषण ड्रोन हल्ले घडवून आणले आहेत. विशेष म्हणजे स्वत:च्या स्वातंत्र्यदिनी युक्रेनने रशियाला झटका दिला आहे. युक्रेनच्या सीमेपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावरील कुर्स्क आण्विक प्रकल्पही ड्रोन हल्ल्याचा शिकार ठरला. ड्रोनमुळे झालेल्या विस्फोटामुळे प्रकल्पातील ट्रान्सफॉर्मरचे नुकसान झाले आणि रिअॅक्टर क्रमांक 3 ची संचालन क्षमता 50 टक्क्यांपर्यंत घटली आहे.
किरणोत्सर्गाची पातळी सामान्य असून ड्रोन हल्ल्यामुळे लागलेल्या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. दोन रिअॅक्टर सध्या वीज उत्पादन करू शकत नाही, तर एका रिअॅक्टरची दुरुस्ती सुरू असल्याचे रशियाकडून सांगण्यात आले. तर फिनलँडच्या उपसागरातून सुमारे 1 हजार किलोमीटर उत्तरेला रशियाच्या उत्तर लेनिनग्राड क्षेत्रातील उस्त-लुगा बंदरावरही युक्रेनने ड्रोन हल्ले घडवून आणले. या ड्रोन हल्ल्यामुळे या बंदरावरील फ्यूल टर्मिनलचे नुकसान झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा काम करत असल्याची माहिती लेनिनग्राड क्षेत्राचे गव्हर्नर अलेक्झेंडर ड्रोज्डेंको यांनी दिली आहे.
उस्त-लुगा फ्यूल टर्मिनल किती महत्त्वपूर्ण
2013 मध्ये सुरू झालेला उस्त-लुगा परिसर कंडेनसेटला हलक्या आणि अवजड नाफ्ता, जेट इंधन, फ्यूल ऑइल आणि गॅसोइलमध्ये प्रक्रियाकृत करतो. हा प्रकल्प कंपनीला तेल उत्पादने आणि गॅस कंडेनसेटला आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये निर्यात करण्याची सुविधा देतो. नोवाटेक मुख्यत्वे चीन, सिंगापूर, तैवान आणि मलेशिया यासारख्या आशियाई देशांसाठी नाफ्ता आणि तुर्कियेसाठी जेट इंधनचे उत्पादन करतो.
अनेक विमानो•ाणे रोखली
रशियाचे नागरी उड्डाण प्राधिकरण रोसावियात्सियानुसार लेनिनग्राड क्षेत्राच्या पुलकोवो विमानतळासह अनेक विमानतळांवरील विमानो•ाणे अनेक तासांपर्यत रोखण्यात आली. युक्रेनच्या ड्रोनन सिजरान शहरातील एका औद्योगिक केंद्रावर हल्ला केला असून यात एक जण जखमी झाला आहे. तर चालू महिन्याच्या प्रारंभी युक्रेनच्या सैन्याने सिजरान तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला केल्याचा दावा केला होता. यानंतर रोसनेफ्टच्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाला उत्पादन रोखावे लागले होते.









