युक्रेनच्या दहशतवादी हल्ल्यांचा सूड घेऊ : रशिया
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाची राजधानी मॉस्कोमधील डिफेन्स मिलिट्री हेडक्वार्टरनजीक झालेल्या ड्रोन हल्ल्याप्रकरणी अमेरिकेने युक्रेनला साथ न देण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेनने मॉस्कोमध्ये 2 ड्रोन्सद्वारे हल्ला केल्याचा आरोप रशियाने केला आहे. या पार्श्वभूमीवर व्हाइट हाउसने स्वत:ची भूमिका स्पष्ट केली आहे.
रशियावरील युक्रेनच्या हल्ल्यांचे अमेरिका कधीच समर्थन करणार नाही. हे युद्ध रशियाने सुरू केले होते. स्वत:चे सैन्य मागे बोलावून रशिया हे युद्ध कधीही संपवू शकतो असे व्हाइट हाउसच्या प्रवक्त्या कॅरीन जीन पियरे यांनी म्हटले आहे. तर रशियाच्या विदेश मंत्रालयाने या हल्ल्यांना युक्रेनचा दहशतवादी हल्ला ठरविले आहे.
युक्रेनने सोमवारी सकाळी 2 इमारतींना ड्रोनद्वारे लक्ष्य केले होते. या हल्ल्यात कुठलीच जीवितहानी झालेली नाही. परंतु इमारतीचे मोठे नुकसान झाले असल्याचा दावा मॉस्कोचे महापौर सर्गेई सोबयानिन यांनी केला आहे. युक्रेनच्या हल्ल्याला हवाई सुरक्षा यंत्रणेने हाणून पाडल्याचे रशियाने म्हटले आहे.
याचदरम्यान रशियाच्या कब्जातील क्रीमियामध्ये देखील सोमवारी रात्री उशिरा य्रेनने 17 ड्रोन्सद्वारे हल्ला केला आहे. या ड्रोन्सद्वारे शस्त्रास्त्रांचे भांडार अन् एका नागरी इमारतीला लक्ष्य करण्यात आले. युक्रेनचे संरक्षणमंत्री ओलेक्सी रेज्निकोव्ह यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. युक्रेन स्वत:च्या नागरिकांच्या रक्षणासाठी रशियावर अशाप्रकारचे हल्ले सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
धान्य करारातून रशियाची माघार
रशियाने मागील आठवड्यात धान्य करारातून माघार घेतल्यावर काळ्या समुद्रानजीक ओडेसामध्ये युक्रेनियन बंदरावर हल्ला केला होता. आम्ही ज्याचा अनुभव घेत आहोत, तोच अनुभव रशियाला देखील येईल असे युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी म्हटले होते. तर जुलैच्या प्रारंभी मॉस्कोमधील 2 इमारतींवर 5 ड्रोन्सद्वारे हल्ला करण्यात आल्याचा आरोप रशियाने केला होता.









