क्रीमिया:
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अद्याप सुरू आहे. दोन्ही देश सातत्याने परस्परांवर आक्रमण करत आहेत. या युद्धादरम्यान युक्रेनने पुन्हा एकदा क्रीमियाला लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात रशियाच्या एका नागरिकाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. क्रीमियाचे बंदर शहर फियोदोसियावर युक्रेनकडून हल्ले करण्यात आले आहेत. युक्रेनच्या हल्ल्यात एका व्यक्तीला जीव गमवावा लागला आहे. तर नोवोचेर्कस्क नावाच्या एका मोठ्या लँडिंग जहाजाचे नुकसान झाल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. युक्रेनने फियोदेसियावर हल्ला करण्यासाठी विमानातून डागण्यात आलेल्या गायडेड क्षेपणास्त्रांचा वापर केला होता, असे रशियाकडून सांगण्यात आले आहे. तर युक्रेनच्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल रशियाकडून क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला आहे.









