जर्मनीच्या मंजुरीनंतर पोलंड करणार पुरवठा
वृत्तसंस्था/ बर्लिन
जर्मनीने पोलंडच्या माध्यमातून युक्रेनला स्वतःचा लेपर्ड 2 रणगाडा पुरविण्यास मंजुरी दिली आहे. जर्मनीत निर्मित लेपर्ड 2 रणगाडा जगातील सर्वात घातक रणगाडय़ांपैकी एक मानला जातो. अफगाणिस्तान आणि सीरिया युद्धात या रणगाडय़ाचा वापर झाला आहे.
हा रणगाडा किती महत्त्वपूर्ण आहे हे आम्हाला ठाऊक आहे. याचमुळे आम्हाला आमच्या भागीदारासोबत याच्या डिलिव्हरीवरून चर्चा करावी लागत आहे. लोकांचा जीव वाचावा आणि रशियाच्या कब्जातून युक्रेनने स्वतःला मुक्त करवून घ्यावे अशी आमची इच्छा असल्याचे जर्मनीच्या विदेशमंत्री अन्नालेना बेयरबॉक यांनी पॅरिस येथील एका बैठकीदरम्यान म्हटले आहे.

परंतु जर्मनी स्वतः युक्रेनला हे रणगाडे पुरविणार नाही. तर जर्मनीत निर्मित लेपर्ड 2 रणगाडे युक्रेनच्या सैन्याला पुरविण्याची मंजुरी पोलंडला देण्यात आली आहे. युक्रेनला थेट अशाप्रकारचे घातक अस्त्र दिल्यास रशियासोबतच्या शत्रुत्वात वाढ होईल अशी भीती जर्मनीला आहे. रशियाने देखील युक्रेनला घातक अस्त्र पुरविण्यावरून इशारा दिला आहे. युक्रेनला शस्त्रास्त्रs पुरवून पाश्चिमात्य देश स्वतःच्या नाशाला आमंत्रित करत असल्याचे रशियन संसदेच्या अध्यक्षांनी म्हटले आहे.
रशियाचा मुकाबला करण्यासाठी युक्रेन पूर्णपणे पाश्चिमात्य देशांच्या शस्त्रास्त्रांवर अवलंबून आहे. परंतु युक्रेनने मागणी केलेली सर्वप्रकारची शस्त्रास्त्रs पाश्चिमात्य देशांकडून पुरविली जात नसल्याचे चित्र आहे. अमेरिकेने जर्मनीवर युक्रेनला लेपर्ड रणगाडे पुरविण्यासाठी दबाव आणला आहे. या दबावादरम्यान अमेरिकेने देखील स्वतःचा अब्राम रणगाडा युक्रेनला पुरवावा अशी मागणी जर्मनीने केली होती.
लेपर्ड रणगाडा पहिल्यांदा 1970 मध्ये तयार करण्यात आला होता, अमेरिकेत निर्मित एम48 पॅटन रणगाडय़ाची जागा लेपर्डने घेतली होती. काही काळातच लेपर्ड रणगाडा युरोपसमवेत जगभरात प्रसिद्ध झाला होता. लेपर्ड रणगाडय़ाला स्वतःच्या वैशिष्टय़ांमुळे ‘ऑलराउंडर’ म्हटले जाते. हा रणगाडा 70 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने पुढे सरकू शकतो. या रणगाडय़ाचे संचालन करणाऱया सैनिकाला चहुबाजूने सुरक्षा उपलब्ध होते. तसेच हा रणगाडा भूसुरुंगांच्या धोक्यापासून वाचवितो आणि याचबरोबर यात अँटीटँक फायर सिस्टीम आहे. युक्रेनला 100 लेपर्ड रणगाडे मिळाल्यास त्याची मोठी सरशी होऊ शकते. याच्या मदतीने युक्रेनच्या सैनिकांना जलदपणे शत्रूच्या विरोधात पुढे सरकता येणार आहे. 62 टनाच्या या रणगाडय़ात अँटी एअरक्राफ्ट मशीन गन आहे. तसेच एक कोक्सियल मशीनगन, स्मूदबोर गन यात असते.









