संयुक्त राष्ट्रसंघ महासभेत भारताची भूमिका
वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ
संयुक्त राष्ट्रसंघ महासभेत बुधवारी युक्रेनच्या स्थितीवर विचारविनिमय झला आहे. या सभेत भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी भूमिका मांडली आहे. युक्रेनमधील संघर्षावरून भारत चिंतेत आहे. शत्रुत्व तत्काळ समाप्त करण्यासाठी चर्चा तसेच कूटनीतिचा मार्ग अवलंबिला जावा. हे युद्धाचे युग नसल्याच्या गोष्टीवर भर दिला जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
युक्रेनमध्ये लाखो लोक बेघर झाले आहेत, शेजारी देशांमध्ये या लोकांना आश्रय घ्यावा लागला आहे. नागरिक आणि पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांचे वृत्त अत्यंत चिंताजनक आहे. क्षेत्रातील अलिकडच्या घटनांमुळे शांतता आणि स्थैर्याच्या मोठ्या उद्देशाची प्राप्ती करण्यास मदत झाली नसल्याचे भारताने नमूद केले आहे.
आंतरराष्ट्रीय कायदा, संयुक्त राष्ट्रसंघ चार्टर आणि सर्व देशांच्या सार्वभौमत्वाच्या सन्मानावर आधारित जागतिक व्यवस्थेचे आम्ही सदस्य आहोत. या तत्वांचे कुठल्याही अपवादाशिवाय पालन केले जावे. शत्रुत्व आणि हिंसा वाढणे कुणाच्याच हिताचे नाही. मतभेद आणि वाद दूर करण्यासाठी चर्चा हाच एकमेव मार्ग आहे. शांततेच्या मार्गासाठी आम्हाला कूटनीतिचे सर्व मार्ग खुले करावे लागतील. युव्रेन युद्धाने ग्लोबल साउथ क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर प्रभावित केले असल्याचा उल्लेख कंबोज यांनी केला आहे.
युक्रेन युद्धाबद्दल भारताचा दृष्टीकोन हा जनक्रेंदीत असणार आहे. आम्ही युक्रेनला मानवीय सहाय्य आणि आर्थिक संकटाला सामोरे जाणाऱ्या ग्लोबल साउथच्या आमच्या काही शेजाऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करत आहोत. भारताने ब्लॅक सी ग्रीनला पूर्ण समर्थन दिले आहे. काळ्या समुद्रातून धान्याची वाहतूक करण्याचा पुढाकार सुरू ठेवण्याच्या संयुक्त राष्ट्रसंघ महासचिवांच्या प्रयत्नांना भारताचे समर्थन आहे. सद्यकाळात निर्माण झालेल्या पेचावर लवकर तोडगा निघेल अशी अपेक्षा असल्याचे भारतीय प्रतिनिधीने म्हटले आहे.









