रुस्तम उमेरोव यांना मिळाली जबाबदारी
वृत्तसंस्था/ कीव्ह
सैन्यामधील भ्रष्टाचारादरम्यान युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी ओलेक्सी रेजनिकोव्ह यांना संरक्षण मंत्रिपदावरून हटविले आहे. रेजनिकोव्ह हे नोव्हेंबर 2021 मध्ये युक्रेनचे संरक्षणमंत्री झाले होते. त्यांच्या जागी आता क्रीमियन तातार वंशाचे माजी खासदार रुस्तम उमेरोव हे संरक्षण मंत्री म्हणून काम पाहणार आहेत.
रेजनिकोव्ह यांनी युद्धाच्या 550 दिवसांपर्यंत संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली आहे. आता संरक्षण विभागाला नव्या दृष्टीकोनाची गरज असल्याचे झेलेंस्की यांनी म्हटले आहे. रेजनिकोव्ह यांच्या कार्यकाळात युक्रेनला रशियाचा सामना करण्यासाठी पाश्चिमात्य देशांकडून मोठी मदत मिळाली आहे.
41 वर्षीय उमेरोव्ह हे युक्रेनमधील विरोधी पक्ष होलोसचे नेते आहेत. रशियासोबत कैदी, सर्वसामान्य नागरिक आणि मुलांची अदलाबदली करविण्याच्या प्रक्रियेत ते सामील राहिले आहेत. तसेच रशियाच्या कब्जातील युक्रेनियन भागांमधून लोकांना बाहेर काढण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
24 जानेवारी रोजी युक्रेनचे उपसंरक्षणमंत्री याचेस्लाव शापोवालोव्ह यांना भ्रष्टाचाराशी निगडित एका प्रकरणी राजीनामा द्यावा लागला होता. याच प्रकरणी रेजनिकोव्ह यांच्यावरही आरोप झाले होते. परंतु रेजनिकोव्ह यांच्यारव भ्रष्टाचाराचा कुठलाही थेट आरोप नाही. युद्धादरम्यान संरक्षण मंत्रालयात झालेल्या भ्रष्टाचारामुळे जगभरात युक्रेनच्या प्रतिमेला धक्का पोहोचल्याचे मानले जात आहे.