ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मोहोळ तालुक्यातील पाटकुल गावात आज पहाटे उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा फुटला. या कालव्यातून 500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. कालवा फुटल्यामुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. ऊस, द्राक्ष, डाळिंब यासह अन्य पिके वाहून गेली आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या घरातही पाणी शिरलं आहे.
शेतीसाठी १८ जानेवारीपासून उजनी धरणातून डाव्या व उजव्या कालव्यामध्ये पाणी सोडण्यात आले होते. आज पहाटे पाटकुल ओढय़ाजवळ उजवा कालवा फुटला. उजवा कालवा 112 किमीचा आहे. या कालव्यातून 500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली. अजूनही पाण्याचा प्रवाह मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. शेतात साचलेल्या पाण्याला वाट मोकळी करून दिली असून, जवळील ओढ्यात पाणी सोडले जात आहे. बेगमपूर, कुरुल व कारंबा या परिसरातील शेतकऱ्यांचे पाणी आता बंद करण्यात आले आहे. काढणीला आलेल्या द्राक्ष बागांचं यात मोठं नुकसान झालं आहे. ऊस, डाळिंब यासह अन्य पिकेही वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या घरातही पाणी शिरले आहे.
अधिक वाचा : मोदी सरकारकडून ‘मुघल गार्डन’चं नामकरण; ‘हे’ असेल नवे नाव
जवळपास 50 वर्षे जुना असलेला हा कालवा अनेक ठिकाणी जीर्ण झाला आहे. त्यामुळे या झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला जात आहे. प्रशासनाकडून तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.