राज्यसभेत ‘खासदार’ म्हणून विराजमान
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
ज्येष्ठ कायदेतज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांनी गुरुवारी संसदेत खासदारकीची शपथ घेतली. गुरुवारी सभागृहाचे कामकाज सुरू होताच उज्ज्वल निकम यांनी राज्यसभेचे सदस्यत्व स्वीकारले. सभागृहाचे विद्यमान उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी त्यांना शपथ दिली. विशेष म्हणजे त्यांनी मराठीत शपथ घेतली. त्यानंतर आवश्यक अहवाल सभागृहाच्या टेबलावर ठेवण्यात आले. या शपथविधी सोहळ्यासाठी निकम यांचे संपूर्ण कुटुंब संसदेत उपस्थित होते. प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती कोट्यातून ही नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यातच रिक्त होत असलेल्या चार जागांवर नव्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती.









