‘कृषी’ आयडीसाठी आवाहन : शेतकऱ्यांचे दुर्लक्ष : कृषी खात्याचे अधिकारी लागले कामाला
बेळगाव : दुष्काळ निवारण मदत वितरणासाठी शेतकऱ्यांची युआयडी नोंदणी अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांची युआयडी झाली नाही, त्या शेतकऱ्यांनी तातडीने रयत संपर्क केंद्र किंवा कृषी केंद्रात युआयडी नोंद करावी, असे आवाहन कृषी खात्याने केले आहे. जिल्ह्यात 11 लाखांहून अधिक शेतकरी आहेत. यापैकी बहुतांशी शेतकऱ्यांची युआयडी नोंद झाली आहे. मात्र, अद्यापही काही शेतकऱ्यांची युआयडी करणे शिल्लक आहे. त्यामुळे कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अडीच लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली आहे. दरम्यान, हानी झालेल्या पिकांचा सर्व्हे करण्यात आला आहे. शिवाय अहवाल देखील शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, बहुतांशी शेतकऱ्यांची युआयडी नोंदणी नसल्याने दुष्काळ निवारण कामात अडचणी येऊ लागल्या आहेत. अशा शेतकऱ्यांनी तातडीने युआयडी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. मोठ्या शेतकऱ्यांना युआयडी मिळणार नसल्याच्या अफवेने युआयडीचे काम रखडले आहे. काही शेतकऱ्यांनी रेशनकार्ड रद्द होईल, या भीतीने युआयडी नोंदणी केली नाही. त्यामुळे कृषी खात्याला दुष्काळ निवारण कामात अडथळा येऊ लागला आहे. जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांची युआयडी झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांची युआयडी करण्यासाठी कृषी खात्याचे अधिकारी कामाला लागले आहेत.
युआयडी नोंद आवश्यक…
ज्या शेतकऱ्यांची युआयडी नाही, त्यांनी तातडीने जवळच्या रयत संपर्क केंद्रात जाऊन युआयडी बनवून घ्यावी. यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे सादर करावीत. यासाठी बँक पासबुक, आधारकार्ड आणि सातबारा उतारा अनिवार्य आहे.
-शिवनगौडा पाटील (सहसंचालक, कृषी खाते)









