आशिया खंडामध्ये एकाच प्रकल्पातून इथेनॉल उत्पादन करणारा एकमेव साखर कारखाना
वार्ताहर/उगार खुर्द
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी शेती उद्योगाला प्राधान्य देण्याच्या हेतूने तसेच परकीय चलनाची बचत करण्याच्या हेतूने व क्रूड तेलावरील अवलंबित्व कमी करून आयातीवर नियंत्रण आणण्यासाठी इथेनॉल मिश्रित पेट्रोलला इबीपी प्रोत्साहन दिले व 20 टक्के इथेनॉल ब्लेंडिंगचे उद्दिष्ट ठेवले. प्रधानमंत्र्यांचे हे उद्दिष्ट समोर ठेवून दि उगार शुगर वर्क्सने एकाच प्रकल्पातून 8 लाख 45 हजार लिटर इथेनॉल निर्मिती करून शासनाच्या एकंदरीत उद्दिष्टाला हातभार लावण्याचा प्रयत्न केला असून आशिया खंडामध्ये कारखान्याच्या एकंदरीत प्रगतीचा गौरव होत आहे. देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी कर्नाटक व महाराष्ट्र राज्यांच्या सीमेवरील उगार खुर्द येथे शिरगावकर बंधूंनी दि उगार शुगर वर्क्स साखर कारखाना स्थापन करून 86 वर्षे पूर्ण झाली आहेत. या कारखान्यामध्ये साखरेबरोबरच मद्यनिर्मिती, को-जनरेशन घटकापासून विद्युतनिर्मिती, उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादन घेण्यास प्रारंभ केला आहे.
उगार साखर कारखान्याची स्थापना 1939 साली झाली. नंतर पहिला गळीत हंगाम 1941-42 मध्ये घेण्यात आला. पहिल्या गळीत हंगामामध्ये 3875 टन ऊस गाळप करण्यात आले. या हंगामातील गाळप क्षमता 500 टन दरदिवशी होत होती. आज या साखर कारखान्यामध्ये दरदिवशी 18 हजार टन उसाचे गाळप होत आहे. तसेच 2008-09 पासून मळली, तालुका जेवरगी येथे 4500 क्षमतेचा साखर कारखाना प्रारंभ करण्यात आला आहे. मागास भागातील शेतकरी व कामगारांना याचा लाभ मिळवून दिला आहे. या साखर कारखान्यामध्ये उसाच्या रसापासून तसेच मका, तांदूळ यातून इथेनॉल निर्मिती करण्यात येत आहे.
सन 2021 पासून नवीन इथेनॉल उत्पादन करण्याचा प्रकल्प कारखान्यात प्रारंभ करण्यात आला आहेत. सुमारे 50 एकर क्षेत्रामध्ये हे घटक उभारण्यात आले आहेत. एकाच प्रकल्पातून रोज 8 लाख 45 हजार लिटर इथेनॉल उत्पादन करण्यात येत आहे. सन 2022-23 गळीत हंगामामध्ये 7.80 कोटी लिटर इथेनॉल उत्पादन घेऊन संपूर्ण आशिया खंडामध्ये अधिक इथेनॉल उत्पादन एकाच प्रकल्पातून करणारा उगार साखर कारखाना म्हणून याची गणना होत आहे. दोन वर्षांपासून दि उगार शुगर वर्क्स साखर कारखान्याने भारतासह आशिया खंडात विक्रम स्थापित केला आहे. कारखान्याचे संस्थापक डॉ. एस. आर. शिरगावकर तसेच विनायकराव शिरगावकर यांच्या विशेष प्रयत्नाने कारखाना उभारणीची मुहूर्तमेढ रोवली. यांच्याबरोबरीने उद्योगपती बाबू काका शिरगावकर, राजाभाऊ शिरगावकर, प्रफुल्लसाहेब शिरगावकर, शिशिरसाहेब शिरगावकर, संजीवसाहेब शिरगावकर यांनी कारखान्याच्या एकंदरीत प्रगतीसाठी विशेष परिश्रम घेतले.
त्यांच्यानंतर संजीव शिरगावकर यांचे सुपुत्र चंदन शिरगावकर यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे प्रगतीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यांना त्यांचे बंधू सोहन शिरगावकर तसेच निरज शिरगावकर यांची मोलाची साथ लाभत आहे. या साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक चंदन शिरगावकर यांनी अखिल भारतीय डिस्टिलर्स असोसिएशन संघटनेच्या अध्यक्षपदी तसेच कर्नाटक ब्रिव्हर्स अँड डिस्टिलर्स असोसिएशन अध्यक्ष, इंडियन शुगर मिल्स असोसिएशन उपसमितीचे अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला आहे. देशातील सर्वच साखर कारखान्यांच्या तज्ञांशी चर्चा होऊन देश व विदेशातील साखर उद्योगाविषयी तज्ञांचे मत घेऊन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उगार साखर कारखान्यामध्ये इथेनॉल प्रकल्प प्रारंभ केला. या प्रकल्पातून एकाच घटकातून उच्चांकी इथेनॉल उत्पादनाचा विक्रम केला आहे.
आशिया खंडात अधिक इथेनॉल उत्पादन करणाऱ्या उगार साखर कारखान्याची नोंद घेऊन चंदन शिरगावकर यांच्या साधनेची सर्वत्र चर्चा होत आहे. अमेरिका सरकारने इथेनॉल उत्पादन तंत्रज्ञानाविषयी विचारविनिमय करण्याकरिता भारत सरकारकडे शिष्टमंडळ पाठवणीच्या मागणीनुसार भारत सरकारने अमेरिका देशाकडे शिष्टमंडळ पाठविले. त्यामध्ये उगार साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर चंदन शिरगावकर यांनी कमिटी सदस्य म्हणून उपस्थित राहून विचार मांडले. याचप्रमाणे ब्राझिलसह इतर देशात साखर उत्पादक उद्योगपतींची भेट घेऊन भारतातील इथेनॉल उत्पादनाविषयी चर्चा घडवून आणण्यामध्ये यशस्वी झाले आहेत. या साखर कारखान्यामध्ये इथेनॉलचे उत्पादन उभारलेल्या प्रकल्पामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन कसे येईल? याकडे चंदन शिरगावकर यांचे लक्ष आहे. कारखान्यातील मजुरांना, शेतकऱ्यांना आरोग्याचे उपचार घेण्याकरिता रुग्णालयाची सोय केली आहे.
केंद्र सरकारची दूरदृष्टी
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशातील साखर कारखान्यांतून इथेनॉल उत्पादन करून पेट्रोलमध्ये याचा वापर होऊन देशातील सर्वच वाहनांना इंधन म्हणून वापरावे. शिवाय विदेशातून पेट्रोल व इतर इंधन आयात कमी करून घेण्याकरिता भारतातील इथेनॉलचे उत्पादन वाढवून साखर कारखान्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम करून शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळावा हीच दूरदृष्टी केंद्र सरकारची आहे.
समाजसेवेचा वसा
साखर कारखान्यात केवळ उसाचेच उत्पादन न करता सामाजिक काळजीही घेतली आहे. सन् 2019 व 2021 या वर्षांमध्ये कोविड काळात साखर कारखान्याने पहिल्यांदाच सॅनिटायझरचे उत्पादन शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, सरकारी कार्यालयांना, कर्नाटक-महाराष्ट्रातील सरकारी कचेरींना, रुग्णालयांना पुरवून व्यवस्था केली. कोविड रुग्णांची सोय व त्यांच्यावर उपचार करण्याकरिता स्वतंत्र 40 कॉटचे कोविड सेंटर उभारले होते, हे एक विशेष कार्य येथील जनता आजही आठवणीत ठेवून आहे. याचप्रमाणे महापुरात संकटात असलेल्या लोकांना खास सोय करून समाजसेवा जपली आहे.









