रवांडाला नमवत प्रथमच टी 20 वर्ल्डकपसाठी पात्र : अमेरिकेत होणाऱ्या वर्ल्डकपसाठी 20 संघ फायनल
वृत्तसंस्था/ हरारे
दक्षिण आफ्रिका खंडातील युगांडा या अगदी छोट्याशा देशाने इतिहास रचताना पुढील वर्षी वेस्ट इंडिज व अमेरिकेत होणाऱ्या टी 20 विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. गुरुवारी झालेल्या पात्रता फेरीतील सामन्यात युगांडाने रवांडा संघाचा एकतर्फी पराभव केला. 2024 च्या टी 20 वेश्वचषकासाठी पात्र ठरणारा युगांडा हा 20 वा संघ ठरला आहे. दुसरीकडे, झिम्बाब्वेला सलग दुसऱ्यांदा टी 20 विश्वचषकात स्थान मिळवता आले नाही. वर्ल्डकपची पात्रता फेरी नामिबिया येथे पार पडली. आयसीसीने ट्विट करत याबाबतची घोषणा केली. 3 जून ते 30 जून या कालावधीत ही स्पर्धा पार पडेल.
टी 20 विश्वचषक स्पर्धेसाठी एकूण वीस संघ पात्र ठरणार होते. जगभरातील इतर विभागीय स्पर्धांमधून 18 संघ यापूर्वीच निश्चित झाले आहेत. आफ्रिका विभागातील पात्रता फेरीत मागील आठवड्यात नामिबिया संघाने आपली जागा निश्चित केली होती तर दुसऱ्या जागेसाठी प्रामुख्याने युगांडा व झिम्बाब्वे यांच्यात लढत होती. साखळी फेरीत झालेल्या सामन्यात युगांडाने झिम्बाब्वेचा पराभव केला होता. गुरुवारी होणाऱ्या आपल्या अखेरच्या साखळी फेरीतील लढतीत युगांडाला विजय मिळवणे अनिवार्य होते. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना रवांडा संघाचा डाव केवळ 65 धावांवर आटोपला. यानंतर युगांडाने विजयासाठीचे आव्हान 8.1 षटकांत एक गडी गमावत पार केले व वर्ल्डकपसाठी पात्रता देखील निश्चित केली. यामुळे झिम्बाब्वे संघाला विश्वचषकात सहभागी होता येणार नाही. युगांडा संघ या विजयासह प्रथमच विश्वचषक खेळेल.
झिम्बाब्वेला सलग दुसऱ्यांदा नारळ
या क्वालिफायरमध्ये झिम्बाब्वेचा संघही सहभागी होता पण त्यांना एकदिवसीय विश्वचषकाप्रमाणे येथूनही रिकाम्या हाताने परतावे लागले. झिम्बाब्वेला टी 20 विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठी रवांडाच्या युगांडावर विजय मिळवण्यासाठी प्रार्थना करावी लागणार होती, पण याठिकाणी युगांडाने रवांडावर एकतर्फी विजय मिळवत सहा सामन्यातील पाचवा विजय मिळवला. दुसरीकडे, केनियाविरुद्ध विजय मिळवल्यानंतर देखील झिम्बाब्वेचा संघ वर्ल्डकपसाठी पात्र ठरु शकला नाही. याआधी त्यांना युगांडा व नामिबियाकडून पराभव स्वीकारावा लागला असल्याने त्यांची वर्ल्डकपवारी हुकली आहे. आफ्रिकन विभागात 7 संघांमध्ये पात्रता फेरी खेळली गेली, ज्यामध्ये नामिबियाचा संघ सध्या गुणतालिकेत पहिल्या तर युगांडाचा संघ 6 सामन्यांमध्ये 5 विजयांसह दुसऱ्या स्थानावर राहिला. झिम्बाब्वेला गुणतालिकेत 8 गुणासह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. युगांडा आणि नामिबियाने प्रत्येकी 5 विजयांसह 10 गुण मिळवले. पण चांगल्या नेट रनरेटमुळे नामिबियाचा संघ प्रथम स्थानावर आहे.
2024 टी 20 वर्ल्डकपसाठी 20 फायनल संघ
वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये प्रथमच 20 संघ सहभागी होणार आहेत. यजमान असल्याने वेस्ट इंडिज आणि अमेरिकेने आधीच आपले स्थान निश्चित केले आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया आणि युगांडा या संघांचा समावेश आहे.









