अध्याय सत्ताविसावा
सविसाव्या अध्यायाच्या शेवटी भगवंतानी सांगितले की, सत्संगाने भगवद्भजन घडत असते आणि त्यामुळे साधकांच्या अंगी पूर्ण वैराग्य येते. भगवद्भक्ति केल्याशिवाय विरक्ती कधीच उत्पन्न व्हावयाची नाही, स्त्री, पुत्र, देह हे सर्व माझं आहे असं माणसाला त्याच्या अहंकारामुळे वाटत असते. तो समूळ मिथ्या होऊन जाणं याचा अर्थ विरक्ती. मिथ्या म्हणजे समोर दिसणाऱ्या गोष्टी आत्मकल्याण साधून देणाऱ्या नाहीत सबब त्या निऊपयोगी आहेत हे लक्षात येणे. जरी स्त्री, पुत्र, स्वत:चा देह इत्यादि गोष्टी समोर दिसत असल्या तरी आत्मोद्धाराच्या दृष्टीने त्या सर्व निऊपयोगी आहेत हे लक्षात आले की, माणसाला ते सर्व मिथ्या वाटू लागतं. माणसाला आपल्या गोतावळ्याबद्दल आणि आपल्या देहरूपाबद्दल ममत्व असतं. ममत्वातून अपेक्षा निर्माण होतात. म्हणून हे ‘मी’ आणि ‘माझे’ चं आसक्तीयुक्त प्रेम असतं. ते नष्ट होणं म्हणजे विरक्ती आणि विरक्तीशिवाय भगवत्प्राप्ती कल्पांतीही होणे नाही. हे श्रीकृष्णांचे बोल उद्धवाने मनापासून ऐकले. ते पूर्णपणे मनात ठेवून त्याने विचार केला की, पूजेच्या माध्यमातून देवाची भक्ती कशी करावी हे देवालाच विचारावे म्हणजे पूजाविधान अचूक होईल. म्हणून विरक्ती येण्यासाठी उद्धव भगवद्भक्ति, पूजाविधान व त्यातील क्रियायोग देवांना विचारत आहे. तो म्हणाला, हे भक्तवत्सल श्रीकृष्णा! जे भक्तजन, ज्या प्रकारे, ज्या उद्देशाने, आपली पूजा अर्चा करतात, तो आपल्या आराधनेचा क्रियायोग तू मला सांग. आपल्या भक्तावर अनुग्रह करण्यासाठी सत्त्वमूर्ती अनंता, तुझे पूजन कोणत्या विधीने करतात? तुझे आराधन आणि क्रियायोगाने तुझे पूजन कसे असते? जीवाभावाने मी तुझा दास आहे. तुझ्या स्वामित्वाच्या सामर्थ्यावर मी कलिकाळालासुद्धा दाद देणार नाही. हा तुझ्याच कृपेचा प्रभाव होय. तू कृपेने युक्त असून कृपाळू आहेस. त्यामुळेच तू भक्तांचा भक्त होतोस. तुझ्या चरणांचा मी दास आहे. म्हणून सलगीने तुला गुह्यार्थ विचारतो आहे. आता इतक्मया अत्यादराने पूजाप्रकार तू विचारतोस तरी कशाला? असे म्हणशील तर त्याचे महत्त्वच तसे आहे. असा विचार मोठमोठ्या लोकांनीही केलेला आहे. देवषी नारद, भगवान व्यास आणि आचार्य बृहस्पती इत्यादी मुनी वारंवार हे मनुष्याच्या परम कल्याणाचे साधन आहे, असे त्यामुळेच सांगतात. प्राचीन वेदविचारनिष्ठ मोठमोठे देव, मोठमोठे ऋषि, अत्यंत श्रेष्ठ प्रतीचा विचार करणारेसुद्धा हेच स्पष्ट बोलले आहेत. देवर्षि नारदाने सांगितलेले पूजाविधान तर प्रसिद्धच आहे. अंगिराचा पुत्र म्हणून प्रसिद्ध असलेले देवांचे गुरूही हेच बोललेले आहेत. सत्यवतीचा पुत्र व्यास, जे मूर्तिमंत नारायण, ज्यानी वेदाचा अर्थ स्पष्ट केला आहे आणि जे महाकवि म्हणून प्रख्यात आहेत, जे सर्व पुराणांचे कर्ते आहेत आणि म्हणूनच ‘सारे जग व्यासोच्छिष्ट आहे’ असे म्हणतात, त्यांनीही भगवत्पूजेचा मार्ग व हा क्रियायोग प्रतिपादन केलेला आहे. हे इतरांचं तर झालंच पण साऱ्या जगाचा जो आजोबा, जो विष्णूच्या पोटी जन्मास आलेला, त्या ब्रह्मदेवानेही हाच विषय द्दढ केला आहे. आपल्याच मुखारविंदातून बाहेर पडलेला हा क्रियायोग ब्रह्मदेवांनी भृग इत्यादी पुत्रांना आणि भगवान शंकरांनी पार्वतीदेवीला सांगितला होता. विशेष म्हणजे हा पूजाविधी तूच कल्पारंभी पुत्रबुद्धीने स्वत: ब्रह्मदेवाला सांगितला आहेस. हे मर्यादारक्षक प्रभो! हाच क्रियायोग सर्वांसाठी उपयुक्त असून परम कल्याणकारी आहे, असे मी समजतो. ह्याप्रमाणे दीनोद्धारासाठी तू ही श्रेष्ठांची परंपरा सुरू केली आहेस. तू दीनांचा खराखुरा दयाळू आहेस. तुझे भजन कोणीही करू शकतो. भजन हे दीनाचा पूर्णपणे उद्धार करणारे आहे. भजनाचा महिमा अपूर्व आहे. त्याच्या योगाने अधमालाही उत्तमोत्तम पदवी प्राप्त होते. भक्त हे भगवद्भक्ति करूनच भगवद्रूप होतात, म्हणूनच श्रीकृष्णा! भक्ताला तू अत्यंत प्रीतीने मान देतोस. तुझे भजनपूजन केले असता तू आपल्या भक्तांना तारतोस, तूंच भक्तांना सन्मानदाता होतोस.
क्रमश:








