अध्याय एकोणतिसावा
उद्धवाने देवांना विचारले, देवा, स्त्रियांना उपदेश करू नकोस असे तुम्ही आत्ता सांगितलेत. पण पूर्वीच्या काळी तर थोर थोर ज्ञानी स्त्रिया होऊन गेल्या. हे कसे शक्य झाले? हृषीकेशी तुम्ही स्वत: यज्ञपत्न्यांना उपदेश केला आहे. उद्धवाच्या बोलण्याचा मतितार्थ भगवंतांना लगेच समजला. ते म्हणाले, अरे उपदेश कुणाला करायचा, तर ज्याचा अधिकार आहे त्याला. आता ती अधिकारी स्त्राr कशी ओळखावी ते सांगतो. जी स्त्राr वाचाळ आहे, बडबडी आहे ती ब्राह्मज्ञानाचा उपदेश करायला अनुचित आहे असे समज. ब्रह्मज्ञान हे गुप्तज्ञान आहे परंतु वाचाळ स्त्राrच्या तोंडातून ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सहजी बोलल्या जातात. भगवंतांचे हे बोलणे नाथमहाराजांनाही पटले. त्यावर त्यांनी त्यांच्या सद्गुरुंना प्रश्न केला की, महाराज माझ्याकडे स्त्रिया, पुरुष उपदेशासाठी येतात. उपदेश घेऊन आपणही भवसागर तरुन जावा अशी त्यांची इच्छा असते पण त्यांच्यापैकी बऱ्याच जणांची उपदेश करण्याची पात्रता नसते. त्यांच्या अंगी ब्रह्मज्ञानाचा उपदेश घेण्याची पात्रता कशी येईल ते कृपा करून मला सांगा. श्रीनाथमहाराजांचा प्रश्न ऐकून, श्रीजनार्दनस्वामी म्हणाले, ब्रह्मज्ञानाचा उपदेश घेण्यासाठी चित्तशुद्धी होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून तू त्यांची चित्तशुद्धी होण्यासाठी प्रथम त्यांना नामस्मरण करण्याचा उपदेश कर. चित्तशुद्धी झाल्याशिवाय जर ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला तर तो फोल ठरतो. त्यांची चित्तशुद्धी झाली की, ते आपणहून अनन्यभावाने शरण येतील मग त्यांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश कर. ज्याच्या मनातला स्त्राrपुरुष हा भेद मिटलेला आहे त्यानेच स्त्रियांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश करावा. त्यावेळीही स्त्राr अधिकारी आहे की नाही हेही लक्षात घ्यावे आणि मगच तिला उपदेश करावा. अधिकारी स्त्राr कशी ओळखावी तेही सांगतो. मी स्त्रियांची निंदा केली हे खरे पण त्यामध्ये काही भाग्यवान सात्विक स्त्रिया असतात. त्यांनी विषयांची आवड त्यागून परमार्थाला आपलासा केलेला असतो. त्यांनी प्रपंचाची हाव, आसक्ती टाकलेली असते. त्यामुळे आलेल्या वैराग्यातून सद्भाव जागृत झालेला असतो. प्रपंचातली कर्तव्ये त्या कोणताही भेदभाव न करता निभावत असतात. अतिथी आणि पतीपुत्रांना जेवायला वाढताना त्या फरक करत नाहीत. त्यांच्या मनात धनाचा लोभ नसतो. अशा स्त्रिया नि:संशय ब्रह्मज्ञानाच्या उपदेशाच्या अधिकारी असतात. आपल्या जन्ममरण चक्राचे निवारण कसे होईल ह्याची त्यांना अत्यंत तळमळ लागलेली असते. माझे भवपाश कोण तोडेल का? त्यासाठी कोणता धर्म करावा हे कुणी सांगेल का? अशी विवंचना त्यांना लागलेली असते. त्या विवंचनेचे समाधान व्हावे म्हणून त्या अति आर्ततेने सदगुरूप्राप्तीची मनी आंस बाळगून असतात. सद्गुरूउपदेश मिळण्यासाठी काया, वाचा, वित्त, जीवित ह्या सगळ्याची कुरवंडी करायची त्यांची तयारी असते. उद्धवा, अशा स्त्रियांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला असता कोणताही दोष लागत नाही. तेव्हा आत्तापर्यंत सांगितलेले पात्रतेचे सर्व निकष लाऊन शिष्यांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला असता त्यांचे दोषनिवारण होते. हे ब्रह्मज्ञान जाणल्यावर जाणण्यासारखे काही बाकी उरतच नाही. त्यांचे जन्ममरणाचे चक्रच संपुष्टात येत असल्याने त्यांच्यात कोणताही दोष उरत नाही. ज्याप्रमाणे अमृतपान केल्यावर पुढे पिण्यासारखे काही शिल्लकच उरत नाही त्याप्रमाणे हे ज्ञान मिळवल्यावर आणखी काही मिळवायचे शिल्लक उरत नाही. भगवंतांचे हे बोलणे ऐकल्यावर उद्धवाच्या मनात आणखी एक शंका उत्पन्न झाली. त्याने विचारले, देवा, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी कितीतरी साधने आहेत असे जाणकार सांगतात पण त्या सर्वासाठी तू तर हे एकच साधन सांगितलेस. असे कसे?
क्रमश:








