अध्याय एकोणतिसावा
उद्धवाला भगवंतांनी ब्रह्मज्ञान कसे होईल हे सोपे करून सांगितले आणि सर्व जगाचे कोटकल्याण होऊन सर्वांनाच उद्धार होण्यासाठी आवश्यक ती सामग्री पुरवली. हे ब्रह्मज्ञान मिळाल्यावर मनुष्य कधीच खालच्या पातळीवर येत नाही. हे सदैव चित्तात धरून ठेवल्यावर अच्युत पदाची प्राप्ती होते. भगवंतानी उद्धवाला ब्रह्मज्ञान दिले खरे पण ते त्याने सरसकट सर्वांना न देता, ज्याची ते जाणून घेण्याची पात्रता आहे त्यालाच ते द्यावे अशी त्यांची इच्छा होती. त्यादृष्टीने हे शुद्ध ज्ञान उद्धवाने कुणाला द्यावे ह्याबद्दल सांगताना ते म्हणाले, उद्धवा, काया वाचा आणि चित्त ज्याने मला अर्पण केले आहे, जो निरपेक्षतेने कर्तव्यकर्म करून केलेले कर्म मला अर्पण करून माझी अनन्य भक्ती करत आहे अशा भक्तालाच मी सांगितलेल्या ब्रह्मज्ञानाचा उपदेश करावा. त्यामध्ये मुख्यत: जेथे जेथे त्यांचे मन जाते तेथे तेथे परिपूर्ण ब्रह्म भरलेले आहे. त्यामुळे ब्रम्हाची उपस्थिती नाही असे स्थानच नाही ह्या गोष्टीवर भर असावा. असे हे समूळ ब्रह्मज्ञान माझ्या भक्तांना दान स्वरुपात जो देईल त्याचा मी संपूर्ण ऋणी होईन. त्याने माझ्यावर केलेल्या उपकारांची परतफेड करण्याएव्हढे माझ्याजवळ काहीच नसल्याने, मी माझे निजरूप त्याला अर्पण करून सदैव त्याच्याजवळ राहीन. भगवंताचे हे वचन ऐकले की, ते श्रीखंड्या होऊन नाथांच्या घरी पाणी का भरत होते हे लक्षात येते. भागवतात एकूण बारा स्कंध आहेत त्यातील एकादश स्कंधावर टीका लिहून नाथानी भागवतातील तत्वज्ञानाचे मंदिर जाणकारांच्या पुढे उभे केले आणि त्यावर हा ब्रह्मनिरूपणाच्या अध्यायाचा कळस चढवला. एव्हढे सगळे केल्यामुळे भगवंताना नाथांचे मोठे ऋण वाटू लागले. त्याची काही प्रमाणात परतफेड करावी म्हणून ते नाथांच्या घरी श्रीखंड्या होऊन राबू लागले. भगवंताच्या श्रीखंड्या होण्याचे रहस्य आपल्याला समजले. आता ते पुढे काय म्हणतात ते समजून घेऊ. ते म्हणतात, जो आपल्या शिष्यांना हे ब्रह्मज्ञान देईल त्याच्या मी परमात्मा अधीन होऊन राहीन. तो जे काही काम सांगेल ते मी आनंदाने करीन. तसेच त्या ब्रह्मदात्याचा उपदेश मिळण्याचे महाभाग्य ज्या श्रोत्यांच्या वाटणीला आले असेल त्या सर्वांचा मी उद्धार करीन. ह्या परब्रह्माचा उपदेश देऊन तो माझ्या भक्तांना निरपेक्षतेने कर्म करायला शिकवेल. त्याच्या ह्या सत्कृत्यामुळे तो मला अत्यंत प्रिय होत असल्याने मी त्याचा अंकित होईन. आणखीन काय सांगू? उद्धवा, जो माझ्या भक्तांना हे ब्रह्मज्ञान देईल त्याच्याहून माझा आवडता कुणीच नसतो हे लक्षात ठेव. तो जेव्हा हे ब्रह्मज्ञान त्याच्या शिष्यांना देत असतो ना तेव्हा जणू तो माझेच रूप झालेला असतो. तो माझा आत्मा होऊन मी त्याचे शरीर होतो. म्हणजे त्याच्या देहाची जागा माझ्या देहाने घेतली असते. त्यामुळे तो जे जे कर्म करतो ते ते सर्व मीच करत असतो असे समज. ज्याप्रमाणे मी अवतार घेतला आहे त्याप्रमाणे तोही अवतारी पुरुष होतो. आम्ही इतके एकरूप होतो की, त्याच्यात व माझ्यात तिळभरसुद्धा फरक रहात नाही. त्याच्या जडदेहाने जे जे कृत्य करणे अपेक्षित आहे ते ते सर्व मी शिरावर घेतो व पार पाडतो आणि त्याबदल्यात माझी सर्व चैतन्यसाम्राज्यरुपी संपत्ती त्याला अर्पण करतो. श्री व्यासांनी ह्या एकादश स्कंधात ज्या ब्रह्मज्ञानाचे वर्णन केलेले आहे ते समजून घेऊन माझ्या भक्तांना जो त्याचे दान करेल त्याला मी स्वत:हून आत्मार्पण करतो. परंतु सगळ्यानाच मी म्हणतो तसे सर्वभूती माझे स्वरूप आहे हे लक्षात घेऊन माझी चौथी भक्ती करणे असे शक्य होईलच असे नाही. त्यांनी ह्या ग्रंथाचे पठण मन लावून करावे. असे केल्याने ते परम पावन होतील. निखळ ब्रह्मज्ञानाची चर्चा असलेला हा तुझा माझा संवाद जो सावध, श्रद्धाळू साधक आदराने वाचेल तो चढत्या वाढत्या श्रेणीने शुद्ध सात्विक होत जाईल.
क्रमश:








