अध्याय एकोणतिसावा
उद्धव द्वारकेत नसतानाही निधनसमयी श्रीकृष्णाने विदुराची आठवण काढली हे त्याला कसे समजले तो कथाभाग आपण पहात आहोत. उद्धव बद्रीकाश्रमाच्या दिशेने जाण्यास निघाला खरा पण वाटेतच त्याला श्रीकृष्णाची अतिशय आठवण येऊ लागली. तो मनात म्हणाला श्रीकृष्ण चरित्राची गोडी अवर्णनीय आहे. त्यापुढे तीर्थाचे महत्त्व ते काय असणार? आयुष्यभर मी श्रीकृष्णाबरोबर राहिलो आणि आता त्याच्या निधनसमयी मी तिथे नेमका हजर नाही ह्याचे मला फार वाईट वाटतंय पण मी परत द्वारकेत गेलो तर श्रीकृष्ण मला तिथे राहू देणार नाही. म्हणून उघडपणे द्वारकेत न जाता उद्धव गुप्तपणे द्वारकेत गेला. तेथे पाहतो तो काय समस्त यादव कुळाचा नाश झालेला त्याला दिसला. सर्व कुळाचा नाश झालेला पाहून उद्विग्न होऊन श्रीकृष्ण अश्वत्थ वृक्षाच्या तळी बसले होते. त्यांचे मऊमुलायम तळपाय एका व्याधाने बघितले. त्याला ते हरणाच्यासारखे वाटले आणि त्याचा वेध घेण्यासाठी त्याने बाण सोडला. बाण लागल्याबरोबर आता आपलं कार्य संपलं ह्या विचाराने देवांना अतिशय सुख वाटले. ते स्वत:शीच म्हणाले, आता मी निजधामाला जायला मोकळा झालो. त्यावेळी तेथे मैत्रेयी आला. त्याला श्रीकृष्णाने उपदेश केला. तो करताना त्यांना विदुराची आठवण झाली. त्याच्यावरच्या प्रेमाने त्यांना त्याचा कळवळा आला.
मृत्युसमयी भक्ताने नारायणाची आठवण करावी म्हणजे त्याला उत्तम गती मिळते असं आपलं शास्त्र सांगतं पण इथं त्याउलट नारायणालाच भक्ताची आठवण झाली. ह्यावरून विदुराच्या भक्तीची थोरवी लक्षात येते. भक्त आणि भगवंत हे विभक्त होऊच शकत नाहीत, त्याचीच ही प्रचीती होय. पुढं भगवंत मैत्रेयाला म्हणाले, आज जर इथे विदुर असता तर मी त्याला ब्रह्मज्ञानाचा सर्वतोपरी उपदेश केला असता पण आता तो इथं नाही. तेव्हा मैत्रेया तूच आता विदुराला तत्वबोध कर. श्रीकृष्णाकडून गुह्यज्ञान मिळाल्याने मैत्रेयाला परम समाधान वाटले. भगवंतांनी मैत्रेयाला मनातले आणखी एक गुह्य सांगितले. ते म्हणाले, हे कलियुग धन्य आहे ह्यात ब्रह्मवादी जन पुष्कळ होतील पण त्यांची ब्राह्मीस्थिती टिकणार नाही हे नक्की समज. ह्याचे कारण असे की, कलीच्या प्रभावाने अहंता आणि ममतेमुळे साधकाचे संसारिक आकर्षण संपलेले नसेल. अहंता आणि ममता न गेल्यामुळे त्याच्या इच्छा अपुऱ्या राहिलेल्या असतील. त्यामुळे त्याची ब्राह्मिस्थिती टिकून राहणार नाही. त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेले असले तरी तो भोगाच्या आणि खाण्याच्यामागे लागलेला दिसेल. ज्याच्यात जिभेवर आणि शिश्नावर आवर घालण्याची शक्ती आहे. त्याचीच ब्राह्मीस्थिती टिकून राहील. मैत्रेय आणि श्रीकृष्णाचा संवाद ऐकून उद्धव श्रीकृष्णापाशी आला. त्याला त्याने प्रदक्षिणा घातली आणि त्याच्या पायाला हात लावून त्याने त्यांना नमस्कार केला. नंतर श्रीकृष्णाचे निर्वाण पाहून उद्धव तेथून निघाला. निघताना जगाचे विश्रामधाम असलेल्या, पुरुषांमध्ये पुरुषोत्तम असलेल्या श्रीकृष्णाला त्याने हृदयात स्थान दिले. आता त्याला विशालतीर्थाकडे जाण्याचे वेध लागले होते. त्याचे मुख्य कारण म्हणजे ज्या श्रीकृष्णासाठी तो द्वारकेत राहण्यासाठी धडपडत होता त्या श्रीकृष्णाचेच आता निधन झाल्याने त्याला आता द्वारकेत राहण्यात काहीच स्वारस्य उरलेले नव्हते. त्यामुळे स्वानंदस्थितीत त्याने बद्रीकाश्रमाकडे प्रयाण केले. उद्धव पूर्णपणे स्वानंदस्थितीत असल्याने तो जेथे जेथे जात होता ते ते ठिकाण भक्ती, ज्ञान आणि वैराग्याने पवित्र होत होते. साधकामध्ये जितकी म्हणून विवेक आणि विरक्ती येते तितकी त्याची बोध करायची शक्ती वाढत जाते. श्रीकृष्णाच्या कृपाशीर्वादाने विवेक आणि विरक्तीने परिपूर्ण झालेला उद्धव ज्ञान आणि भक्तीचा उपदेश करत पुढे निघाला होता.
क्रमश:








