निवडणूक आयोगाकडून मिळाली मंजुरी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
निवडणूक आयोगाने शिवसेना (उबाठा) पक्षाला शासकीय कंपनी वगळता कुठलीही व्यक्ती किंवा कंपनीकडून देण्यात आलेली देणगी स्वीकारण्यास गुरुवारी अनुमती दिली आहे. पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी सार्वजनिक देणगी स्वीकारण्यास मंजुरी देण्याची केलेली मागणी आयोगाने मान्य केली आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षाचे बहुतांश आमदार अन् खासदार गेल्याने पक्ष दोन गटांमध्ये विभागला गेला होता. शिंदे गट हाच मूळ शिवसेना असल्याचा निकाल आयोगाने यापूर्वीच दिला आहे.
शिवसेना (उबाठा) पक्षाचे महासचिव सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळाने गुरुवारी आयोगाची याप्रकरणी भेट घेतली होती. निवडणूक आयोगाने पक्षाला लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 चे कलम 29 ब आणि कलम 29 क अंतर्गत देणगी स्वीकारण्यास मंजुरी दिली आहे. महाराष्ट्रात यंदा ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून मतदारांना स्वत:च्या बाजूने वळविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीति तयार करण्यासाठी प्रमुख नेत्यांसोबत बैठक घेतली आहे. सर्व जागांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी थिंक टँकसोबत एक वॉर रुम स्थापन करण्याच्या योजनेवर काम सुरू असल्याचे समजते.









