ऑनलाईन टीम / तरुण भारत :
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना 84.6 कोटींच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात CBI ने क्लीन चिट दिली आहे. पाटणकर यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचे कोणतेही पुरावे न आढळल्याने सीबीआयने मुंबई सत्र न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला. न्यायालयानेही हा क्लोजर रिपोर्ट स्विकारला. या प्रकरणातील तपास थांबवण्यास मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयाने केंद्रीय तपासयंत्रणेला हिरवा कंदील दाखवला आहे.
मेसर्स पुष्पक बुलियन हा ग्रुप महेश पटेल, चंद्रकांत पटेल आणि कुटुंबीयांच्या मालकीचा आहे. या कंपनीची 6 कोटी 45 लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेत निलांबरी प्रोजेक्टमधल्या 11 फ्लॅट्सचा समावेश आहे. निलांबरी प्रोजेक्ट हा साईबाबा गृहनिर्माण प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा असून, ही कंपनी श्रीधर पाटणकर यांची आहे. पुष्पक ग्रुपने नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या शेल कंपनीच्या माध्यमातून पैसा पाटणकरांच्या कंपनीला दिला होता. हा पैसा सोने खरेदीतून पांढरा करण्यात आला असा आरोप होता.
या कथित घोटाळय़ाप्रकरणी ईडीने युनियन बँकेचे अधिकारी, काही ज्वेलर्स आणि पुष्पक बुलियन कंपनीचे संचालक यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता. तपासाअंती आरोपींविरोधात कोणतेही पुरावे सापडत नसल्याने हा तपास बंद करत असल्याचा अहवाल सीबीआयच्यावतीने न्यायालयात सादर करण्यात आला. हा रिपोर्टही न्यायालयाने स्विकारला.