हुकूमशाही आम्ही डोळ्यांनी पाहिली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सातारा : “उद्धव ठाकरे हे हुकूमशहा होते आणि अजूनही आहेत,” अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी लोकशाही नव्हे तर हुकूमशाही मार्गाने राज्यकारभार केला आणि त्यामुळेच आम्ही बाजूला झालो, असंही शिंदेंनी स्पष्ट केलं.
ते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात कंगना राणावत यांचे घर पाडले गेले, नारायण राणेंना जेवत असताना ताटावरून उठवण्यात आलं, पत्रकारांना मारहाण झाली आणि अटक करण्यात आली. अर्णव गोस्वामी यांना केवळ टीका केल्याबद्दल तुरुंगात डांबण्यात आलं. ही लोकशाही नाही, ही हुकूमशाही होती आणि आम्ही ती डोळ्यांनी पाहिली.”
लोकसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानांवरही शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. “ते म्हणतात याला जेलमध्ये टाका, त्याला बर्फाच्या लादीवर झोपवा. ही भाषा लोकशाहीची नाही. ही धमकी आणि सूडबुद्धीची भाषा आहे,” असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारपूर्वक बोलण्याचा सल्ला दिला.
“कोणीही बोलताना लक्षात ठेवावं की जेव्हा आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो, तेव्हा इतर चार बोटं आपल्याकडे असतात,” त्यामुळे विचार करूनच बोलावं असा देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले








