ऑनलाईन टीम / तरुण भारत :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उद्धव ठाकरेंना 2014 आणि 2017 साली युतीचा प्रस्ताव दिला होता. मात्र, उद्धव ठाकरेंनी हा प्रस्ताव फेटाळला. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना यासंदर्भात खुलासा केला.
देशपांडे म्हणाले, अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांच्या बंडानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. मनसेच्या काल झालेल्या बैठकीतही आमच्या पदाधिकाऱ्यांनी हा सूर आवळला. लोकांच्या भावनांचा आम्ही आदर करतो. मात्र, उद्धव ठाकरेंना आमच्यासोबत युती करायची नाही. 2014 आणि 2017 साली राज ठाकरे यांनी युतीसाठी उद्धव ठाकरेंकडे हात पुढे केला होता. मात्र, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
सध्याच्या राजकारणात युती किंवा आघाडी ही सगळी समीकरणं गरजेतून घडतात. आता सध्या गरज आहे का? याचा विचार पक्ष नेतृत्त्व करत असतं, असेही देशपांडे म्हणाले.








