प्रतिनिधी / जळगाव :
महाराष्ट्रावरील संकट दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हनुमान चालीसा पठण करण्याची विनंती केली होती. पण त्यांनी त्याकडे पाठ फिरवली. आम्हालाही हनुमान चालिसा वाचू दिली नाही. उलट तुरुंगात टाकले. तुरुंगात आम्हाला साधी सतरंजीही दिली नाही. त्यामुळे आज त्यांच्याकडे सतरंजी उचलायला कार्यकर्ता उरला नाही, अशी बोचरी टीका खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केली.
जळगावात हनुमान चालिसा पठणाचा सामुहिक कार्यक्रम पार पडला. यावेळी नवनीत राणा म्हणाल्या, आम्ही मोदी भक्त आहोत, याचा आम्हाला गर्व आहे. महाराष्ट्रावरील संकट दूर होण्यासाठी उद्धव ठाकरेंना हनुमान चालिसा पठण करण्याची विनंती केली होती. पण त्यांनी पठण केले नाही. उलट आम्हालाच तुरूंगात टाकले. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना गरिबांच्या व्यथा काय कळणार. या देशात रामभक्त होणे हनुमान चालिसा वाचणे हा गुन्हा आहे का, असा सवाल उपस्थितांना केला.
अधिक वाचा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, साताऱ्याच्या दोघांचा मृत्यू
महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी महिलांचा नेहमीच सन्मान केला. उध्दव ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत राहिल्याने खऱ्या हिंदुत्वाचे विचार विसरून गेले. त्यांनी एका महिलेला तुरूंगात टाकले. हनुमान चालिसा वाचू दिली नाही. तुरूंगात साधी सतरंजी दिली नाही. पण आज त्यांच्याकडे सतरंजी उचलायला कुणी नाही. हेच बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी एकदा नाही तर हजार वेळा हनुमान चालिसा वाचा, असे म्हटले असते. पण उद्धव ठाकरेंनी हिंदू विचारधारा कधीच सोडली आहे. मी कमजोर महिला नाही. परत लढणार असा निर्धार राणा यांनी यावेळी व्यक्त केला.
मुख्यमंत्री पदावर असताना ठाकरे यांनी राज्यातील जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. ते फक्त फेसबुकच्या माध्यमातून जनतेपर्यंत जात होते, ही महाराष्ट्रासाठी दुर्देवाची बाब होती. आगामी काळात आपण लव्ह जिहाद विरोधात मोठी मोहिम उभारणार असून, याची सुरवात अमरावतीपासून केली आहे. राज्यात ज्या-ज्या ठिकाणी लव्ह जिहादच्या कचाटयात कुणी सापडले असेल, त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.